Police Commissioner Amitesh Kumar meeting with hotel operators

    पुणे : पुण्यातील हॉटेलांसाठी कडक नियम लावत १४४ नुसार आदेश काढल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉटेल चालकांची बैठक घेतली. तसेच, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगत नियम पाळणाऱ्यांना त्रास होणार नाही, याची हमीदेखील दिली.

    सुधारित नियमावली व त्याबाबतचे आदेश लवकरच

    दरम्यान, ‘बार, रुफटॉप हॉटेल आणि पबसोबत रेस्टॉरंटही सर्व नियमांचे पालन करीत मध्यरात्री दीडपर्यंत सुरू राहतील. पोलीस रेस्टॉरंटना अकरा वाजता बंद करण्यासाठी तगादा लावण्यात येणार नाही,’ असेही या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. तर, सुधारित नियमावली व त्याबाबतचे आदेश लवकरच काढण्यात येतील आहे, असे त्यांनी सांगितले.

    हॉटेल आणि पबचालकांसाठी नियमावली

    पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील रेस्टॉरंट, बार, रुफटॉप हॉटेल आणि पबचालकांसाठी नियमावली तयार केली होती. नियमावली प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवसांसाठी लागू केली होती. तर कलम १४४ नुसार जमावबंदीचा आदेश काढला होता. त्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते.

    बार, पब दीड वाजेपर्यंत राहणार सुरू

    या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्व हॉटेल चालकांची बैठक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली. बैठकीत पोलिसांच्या नियमावलीबाबत हरकती व सूचनांसह त्यांच्या अडीअडचणींवर चर्चा झाली. बार, पब दीड वाजेपर्यंत सुरू राहत असले तरीही रेस्टॉरंट मात्र रात्री ११ वाजता बंद करण्यासाठी पोलीस आग्रही असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर रेस्टॉरंट चालकांना नाहक त्रास देण्यात येऊ नये, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

    दीड वाजेपर्यंत पोलिसांचा अनावश्यक त्रास नाही
    बार किंवा पबसाठी मध्यरात्री दीडपर्यंतची मुदत यापूर्वीच होती. तसेच, दीड वाजता संबंधित आस्थापना बंद झाल्यानंतर ग्राहक-कर्मचाऱ्यांना आवरा-आवर करून बाहेर येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, अर्ध्यातासाचा वेळ वाढीव देण्यात आला आहे. वेळेच्या मर्यादेत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही. त्यानंतरही कोणी बार, पब सुरू ठेवत असेल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

    पोलिस आयुक्तांच्या सूचना
    – रूफ टॉप हॉटेलमध्ये दहा वाजता साऊंड सिस्टम बंद करावी लागेल.
    – रूफ टॉप हॉटेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या हॉटेलला दारू विक्रीचा परवाना नसल्यास कारवाई होणार.
    – हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई मोहिम राबविणार.
    – मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा परिसरात रस्त्यावर दारू पिणाऱ्यांसह त्यास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई करणार.

    हॉटेल, बार किंवा पबचालकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करावा, त्यात शिस्त असावी, हा हेतू आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संबंधित आस्थापनांना विनाकारण कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. तशा सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत.
    – अमितेशकुमार (पोलिस आयुक्त, पुणे शहर)