देश-विदेशातून भारत जोडोसाठी यात्री दाखल, कापशी फाटा ते नांदेड पदयात्रेला तुफान प्रतिसाद

आम्ही परदेशात असलो तरी आमच्या हृदयात कायम मातृभूमीच आहे. आपल्या देशाची स्थिती अत्यंत वाईट आहे. राजकीय-सामाजिक ध्रुवीकरण होत असून समाजात फूट पडली जात आहे. त्याविरुद्ध राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आजच दाखल झालो आहोत. आम्ही 'नफरत छोडो भारत जोडो'चा संदेश घराघरात पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    नांदेड : कापशी फाटा ते नांदेड पदयात्रेला गुरुवारी सकाळी तुफान प्रतिसाद मिळला. देश-विदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य जनता यात्रेत उत्स्फुर्दपणे सहभागी झाली होती. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीस काँग्रेस यूएसएचे अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील आयओसी युरोप संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेकरूंसोबत सामील होण्यासाठी आले होते. अमेरिकेहून भारतात खास भारत जोडो पदयात्रेसाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

    आम्ही परदेशात असलो तरी आमच्या हृदयात कायम मातृभूमीच आहे. आपल्या देशाची स्थिती अत्यंत वाईट आहे. राजकीय-सामाजिक ध्रुवीकरण होत असून समाजात फूट पडली जात आहे. त्याविरुद्ध राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आजच दाखल झालो आहोत. आम्ही ‘नफरत छोडो भारत जोडो’चा संदेश घराघरात पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूयार्क मध्ये टाइम्स स्केअर ते युनियन स्केअर मधील गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत त्यांनी नुकतीच तीन किलोमीटर पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे.

    आज ते काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना भेटून यात्रेत सहभागी झाले. भारत माता कि जय…! ‘भारत जोडो’चे नारे देऊ लागले. नायगाव येथील प्रणिता प्रकाश कांबळकर ही बारा वर्षाची मुलगी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन रस्त्याच्या कडेला आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसहित उभी होती. मोदी सरकारने संविधान धोक्यात आणले आहे. ते वाचविण्यासाठी आम्ही राहुल गांधीना पाठबळ द्यायचे आहे, असे तिने सांगितले.

    लोहा गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना थेट खात्यावर पैसे पाठविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अहो, ही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे. एकीकडे खते तीन हजाराने गोणी झालीय. तर शेतात कामगाराला माणसी रोजंदारी ५०० रुपये द्यावे लागतात. सरकारने एवढी महागाई वाढवून ठेवलीय की, त्यात एका हातातून शेतकऱ्यांकडून काढून घेतात आणि त्यातले थोडे आमचे आम्हालाच खात्यात परत देतात. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवण्यासाठीच आम्ही राहुल गांधींच्या सोबत यात्रेत आहोत, असे ते शेतकरी सांगत होते.