कृतज्ञता सोहळ्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा : प्रभाकर देशमुख

टेंभूचे पाणी आरक्षित करुन वर्षांनुवर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रविवार (दि.१२) सकाळी ११:३० वाजता वरकुटे-मलवडी (ता. माण) येथे कृतज्ञता सोहळा आयोजित केला असून, या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केले. 

  म्हसवड : टेंभूचे पाणी आरक्षित करुन वर्षांनुवर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रविवार (दि.१२) सकाळी ११:३० वाजता वरकुटे-मलवडी (ता. माण) येथे कृतज्ञता सोहळा आयोजित केला असून, या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केले.

  दहिवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रभाकर देशमुख म्हणाले, गेली अनेक वर्षे टेंभू उपसा योजनेअंतर्गत आपल्या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. टेंभूचे पाणी आरक्षित करण्यासाठी मी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेवून टेंभूचे २.५ टी.एम.सी. पाणी माण-खटाव तालुक्यातील ४८ गावांसाठी आरक्षित करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी टेंभू योजनेअंतर्गत पाणी आरक्षित केल्याबद्दल माण-खटावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे रविवार (दि.१२) सकाळी ठीक ११.३० वाजता वरकुटे-मलवडी येथे उपस्थित राहणार आहेत.

  यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  माण-खटाव साठी हा ऐतिहासिक क्षण असून, या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केली आहे.

  तांत्रिक अडचणींमुळे सोहळ्याचे ठिकाण बदलले

  हा कृतज्ञता सोहळा कुकुडवाड येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेवून सर्वसंमतीने सोहळ्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वरकुटे-मलवडी येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभाकर देशमुख यांनी दिली.