धुळे जिल्ह्यात प्रथमच बाउन्सर, पहिलवान, मल्लांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोटीस

लोकसभा निवडणुकीपूर्वी आवश्‍यक त्या उपाययोजनांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गती दिली आहे. खात्यांतर्गत शिस्त राहावी, कामकाजात कुचराई करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. यापाठोपाठ आता धुळे जिल्ह्यात प्रथमच बाउन्सर, जीममधील पहिलवान, मल्लांना सीआरपीसी १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येत आहे.

    लोकसभा निवडणुकीपूर्वी आवश्‍यक त्या उपाययोजनांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गती दिली आहे. खात्यांतर्गत शिस्त राहावी, कामकाजात कुचराई करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. यापाठोपाठ आता धुळे जिल्ह्यात प्रथमच बाउन्सर, जीममधील पहिलवान, मल्लांना सीआरपीसी १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येत आहे.
    आगामी लोकसभा निवडणुकीवेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी ही नोटीस बजावली जात आहे. पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले, की निवडणुकांमध्ये काही गुन्हेगार बाउन्सर्स, पहिलवान, मल्लांना बॉडीगार्ड म्हणून सोबत घेतात. याद्वारे समाजातील सर्वसामान्यांसमोर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकतो. या प्रकाराचा बंदोबस्त व्हावा यासाठी आतापासून पोलिस प्रशासनाने ही कार्यवाही हाती घेतली असून, योग्य ती प्रक्रिया राबविली जात आहे. संबंधित एजन्सीद्वारे खासगी सुरक्षारक्षक (बाउन्सर) पुरविण्याचा व्यवसाय केला जात असतो. याअनुषंगाने विविध निवडणुकांमध्ये तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत संबंधित एजन्सीद्वारे बाउन्सर पुरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    खासगी सुरक्षारक्षक म्हणजेच बाउन्सर, पहिलवान, कुस्तीगीर, बॉडीबिल्डर आदी त्यांच्या कामाच्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचे हिंसक वर्तन होऊ नये. त्यांची समाजात दहशत पसरणार नाही अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, तसेच त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची आक्षेपार्ह कृती, वर्तन, उच्चार अथवा हावभाव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जावी.
    तसेच कोणत्याही गुन्हेगारांना अथवा समाजकंटकांचे अंगरक्षक (बॉडीगार्ड) अथवा सेवक म्हणून मनुष्यबळ उपलब्ध करून देणार नाहीत अगर पुरविणार नाहीत. तसे केल्यास संबंधित एजन्सीविरोधात कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी दिला आहे. धुळे जिल्ह्यात एकूण ३१ खासगी सुरक्षा अभिकरण परवानाधारक एजन्सीज आहेत. त्याचप्रमाणे ९४ व्यायामशाळा, जीम आणि १६ कुस्तीचे आखाडे आहेत. त्या सर्वांना प्रतिबंधात्मक कारवाईसंदर्भात नोटीस बजावण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राप्त अधिकारान्वये राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा हा एक भाग आहे.