गणेशोत्सवात मोबाईल चोरणारी परराज्यातील टोळी जेरबंद; चोरट्यांकडून चोरीचे २० मोबाईल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणार्‍या परराज्यातील टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांच्या टोळीकडून महागडे तब्बल २० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

    पुणे : गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणार्‍या परराज्यातील टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांच्या टोळीकडून महागडे तब्बल २० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट व हडपसर भागातून मोबाईल चोरले असल्याचे समोर आले आहे. पकडलेली टोळी ही उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमधून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    कौशल मुन्ना रावत (२१, रा. लखनौ, उत्तरप्रदेश), मंतोषसिंग श्रवण सिंह (२२, रा. झारखंड), जोगेश्वर कुमार रतन महतो (३०, रा. झारखंड), सुरज रामलाल महातो (३०, रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

    परिमंडळ पाचचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार अजित मदने, प्रशांत टोणेप व यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

    गणेशोत्सवात मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. शहराच्या मध्यभागासह उपनगरातही गर्दीचे प्रमाण मोठे असते. या गर्दीत नागरिकांचे मोबाइल तसेच मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी या दहा दिवसांच्या कालावधीत चोरटे खास मोबाईल चोरीसाठी येत असल्याचे वास्तव आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले जातात. तसेच, स्थानिक पोलीस देखील पेट्रोलिंग करतात.

    हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यावेळी गर्दीत मोबाईल चोरी करणारे आरोपी हे गांधी चौकात थांबले असल्याची माहिती अंमलदार अजित मदने, प्रशांत टोणपे यांना मिळाली. त्यानूसार सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे व त्यांच्या पथकाने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपयांचे चोरीचे २० मोबाइल जप्त करण्यात आले. आरोपी हे लखनौ रेल्वे स्टेशनवर एकत्रित भेटले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी गर्दीच्या ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे.