sudhir mungantiwar

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार परदेशात असताना 200 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या बदल्या पैशांच्या मोबदल्यात केल्याचा आरोप आहे.

  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या विभागामध्ये (Forest Department) पैशाच्या मोबदल्यात बदल्या झाल्याचा आरोप आहे. त्याबाबत भाजपच्याच चार आमदारांची वनमंत्र्याकडे तक्रार करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार परदेशात असताना 200 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या बदल्या पैशांच्या मोबदल्यात केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी “माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झालेल्या नाहीत. बदल्यांसंदर्भातील अधिकार मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तरीही मी आमदारांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश दिले आहेत”, असं सांगितलं.

  या प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहेत. “माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झालेल्या नाहीत. बदल्यांसंदर्भात जे अधिकार आहेत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. बदल्या या गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तुमच्या स्तरावर पारदर्शक पद्धतीने करा असे मी आदेश दिले आहेत. आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा नव्हती. यामध्ये काही आमदारांनी अधिकाऱ्यांविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या विभागाला सूचना केली, त्याची सगळी माहिती घेऊन चौकशी करा. चांगली जागा कोणालाही देताना त्याची गुणवत्ता तपासून घ्या. हे आता तपासल्यावर यासंदर्भात निर्णय हा विभाग घेईल, हे सुद्धा अधिकाऱ्यांचे आहेत. बदल्यांमध्ये मी गुंतावं अशा भूमिकेचा मी नाही. कारवाई निश्चितपणाने होईल, कुठेही शंता असेल तर कारवाई करा अशा सूचना दिल्या आहे,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  नेमकं प्रकरण काय?
  वन खात्याने 31 मे 2023 रोजी 39 सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्या बदल्या केल्या, तर 12 जणांना त्याच जागेवर मुदतवाढ दिली. यात काही एसीएफच्या बदल्या प्रादेशिक टू प्रादेशिक, तर काही जणांना पुन्हा तोच विभाग दिल्याची तक्रार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या बदल्यांमध्येही अर्थकारण झाल्याची चर्चा थेट मंत्रालयात होत आहे. सहाय्यक वनसंरक्षकांच्या बदल्यांची फाईलसुद्धा वनमंत्र्यांनी मागवली आहे. त्यामुळे एसीएफच्या बदल्या थांबण्याची शक्यता आहे.

  राज्यात सुमारे 200 पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार झाले आहेत. अनियमितता झाल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी. राव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमीता बिश्वास यांची सोमवार, 5 जून रोजी वन मंत्रालयात प्रधान सचिवांच्या दालनात पेशी होणार आहे.वनीकरण, वन्यजीव विभागात बदल्या झाल्याची तक्रार केली आहे. आरएफओंच्या बदल्या करतानाचे आमदारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने निकष कोणते, कोणत्या चौकशीदरम्यान पाणी कुठे मुरले, नियमावलींचे पालन केले, याचा शोध घेतला जाणार आहे.

  प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी बदल्या केल्यानंतर त्यांना स्थगिती देण्याचा प्रकार वन विभागात पहिल्यांदाच घडला आहे. आरएफओंच्या बदल्यांमध्ये अर्थकारण, गैरप्रकार झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार बदल्यांना स्थगिती देताना आरएफओंच्या बदली प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.पीसीसीएफ राव आणि एपीसीएफ बिश्वास यांना आरएफओंच्या बदल्यांची फाईल घेऊन जावे लागणार आहे. अनियमितता कुठे झाली? याबाबतची सखोल चौकशी केली.

  कोणाची तक्रार?
  हरिभाऊ बागडे, राम सातपुते, रणधीर सावरकर आणि आशिष जयस्वाल या चार आमदारांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे.