कासची वनसंपदा धोक्यात! स्थानिकांकडून सरंक्षण, व्यापारी प्रवृत्तीचा फटका

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारची वनसंपदा टिकवण्याचं काम स्थानिक ग्रामस्थ वर्षानुवर्षे करत आहेत, परंतु व्यापारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे कासची वनसंपदा धोक्यात आली आहे, असे परखड मत ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांनी व्यक्त केले.

  कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारची वनसंपदा टिकवण्याचं काम स्थानिक ग्रामस्थ वर्षानुवर्षे करत आहेत, परंतु व्यापारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे कासची वनसंपदा धोक्यात आली आहे, असे परखड मत ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांनी व्यक्त केले.

  सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कास पठार संवर्धन चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सह्याद्री व्याघ्रराखीवचे उपसंचालक उत्तम सावंत, वनस्पती शास्त्रज्ञ सी. बी. साळुंखे, प्रा. शेखर मोहिते, कासच्या अभ्यासिका प्रेरणा अग्रवाल, सुनील भोईटे, कन्हैयालाल राजपुरोहित, अॅड. नीलिमा कदम, महारुद्र तिकडे, पुरुषोत्तम पाटील, शैलेंद्र पाटील, कास पठार समितीचे अध्यक्ष बजरंग कदम, माजी अध्यक्ष आणि सदस्य सोमनाथ जाधव, गोविंद कीर्दत आदिंनी मनोगत व्यक्त केले.
  या बैठकीत फ्लेक्झिबल कुंपण, कास पठारच्या खालील बाजूस माहिती केंद्र, हवामान केंद्र, जमिनीची धूप राखण्यासाठी उपाययोजना, कंट्रोल टुरिझम, कास पठारावरील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करणे, कास पठारावरील कमी होत असलेली चराईबंदी, कास तलाव परिसरात होत असलेली अस्वच्छता स्थानिक लोकांनी लोकांच्या बांधकामांना संरक्षण देणे, ती बांधकामे निसर्गपूर्वक असावीत, यासाठी स्थानिकांना मार्गदर्शक तत्वे  इत्यादी मुद्दे मांडण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांनी स्वागत केले सातारा जिल्ह्याचे उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी कासची वनसंपदा टिकवण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल असे गृहीत धरून सर्वांचे आभार मानले.

  यावेळी सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, मेढ्याचे वनक्षेत्रपाल परदेशी कास पठार समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत, कास पठार समितीचे सर्व सदस्य, स्थानिक सहा गावातील ग्रामस्थ, साताऱ्यातील पर्यावरण प्रेमी कास प्रेमी बउपस्थित होते. समितीचे सदस्य सोमनाथ जाधव म्हणाले,  कासच्यापुढे जवळजवळ १३० ते १४० गावे आहेत. या गावातील लोकांना दळणवळण करण्यासाठी कासच्या रस्त्याचाच वापर करावा लागतो. या रस्त्यावरून असंख्य वाहने रोज जात असतात. कास परिसरातील शेती धोक्यात असल्याने रोजगार वाढीसाठी आणि गस्तीसाठी समितीने कास नाईट जंगल सफारी सुरू केली आहे. त्याच्यामुळे परिसरातील युवकांना रोजगार मिळत आहे. रात्रग्रस्त सुद्धा होत आहे.

  रोजगार वाढीला विराेध चुकीचा
  जंगल सफारीमुळे प्राण्यांच्या भ्रमणात अडथळा निर्माण होतो, असा शोध काही मंडळींनी लावला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. १०१२ साली इथे राहत असलेले स्थानिक आणि आज राहत असलेले स्थानिक याचा जर अभ्यास केला ते प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. लोकं स्थलांतरित होत आहेत, याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. रोजगार वाढण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला विरोध करणे चुकीचे आहे असे मत यावेळी समितीचे सदस्य सोमनाथ जाधव यांनी व्यक्त केले.

  वातावरण बदलाचा परिणाम
  डॉ. यादव म्हणाले, पठार उत्क्रांतीचे ठिकाण आहे. पर्यावरणाचा माणूस हा मुख्य शत्रू असून कासचे जागतिक नामांकन टिकवण्यासाठी व्यापारी प्रवृत्तीच्या लोकांना रोखले पाहिजे. वातावरण बदलाचा परिणाम सुद्धा कासवर झाला आहे, याचाही आपण विचार करणे गरजेचे आहे.

  स्थानिकांच्या रोजगार वाढीसाठी चालू असलेल्या प्रयत्नांना विरोध करणे चुकीचे कासची वनसंपदा स्थानिकांनी कालही जपली आजही जपत आहेत आणि उद्याही जपणार आहेत. कासचा अभ्यास करणाऱ्या पर्यावरण प्रेमी मंडळींमुळे कासला जागतिक दर्जाचे नामांकन मिळाले हे कास परिसरातीलय स्थानिक ग्रामस्थ कधी विसरणार नाहीत.

  -सोमनाथ जाधव, सदस्य, काठ पठार समिती