संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

  मुंबई : बनावट व्हिसा आणि इतर कागदपत्रांच्या आधारे अनेकांनी देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकले असेल. असाच प्रकार गुजरातचा रहिवासी असलेल्या 35 वर्षीय जेनिष सुभाषभाई पटेल याने केला आहे. त्याने कॅनडाला जाण्यासाठी बनावट व्हिसा (Fake Visa), इतर कागपत्रेही बनवली. मात्र, इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडल्याने त्याचा इरादा फसल्याचे समोर आले आहे.

  जेनिष पटेल हा 2006 चे 2023 पर्यंत एका टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याचे नातेवाईक कॅनडामध्ये स्थायिक झाल्याने त्यालाही तिथे स्थलांतरित व्हायचे होते. त्यासाठी 2019 मध्ये गुजरातला राहणारा एजेंट आकाश याने त्याला बनावट कागदपत्र मिळवून देत त्या बदल्यात अडीच लाख रुपये घेतले. तर व्हिसासाठी एजंट अल्पेश अमीन याने एक लाख रुपये आकारले.

  असा अडकला जेनिष

  ब्युरो ऑफ इमिग्रेशन या ठिकाणी तक्रारदार अभिनव यादव हे असिस्टंट इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यादव यांनी तपासणी करताना कॅनडा देशात कोणत्या कारणास्तव जात आहे, याची विचारणा केली. मात्र, पटेल त्याबाबत कोणती समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे यादव यांनी त्याच्या शिक्षणाबाबत चौकशी केली तेव्हा त्याने तो बीकॉम पदवीधर असल्याचे सांगत शैक्षणिक कागदपत्रे सादर केली. त्यानंतर त्याच्यावर संशय आल्याने अधिक चौकशी केल्यानंतर घडला प्रकार समोर आला.

  गुन्हा दाखल

  कॅनडाचा व्हिसा घेऊन विमानाने निघालेल्या जेनिष सुभाषभाई पटेल याला सहारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.