गणरायाच्या विसर्जनाला राजकीय मतभेद विसरून चंद्रकांतदादा आणि आदित्यनी एकत्र उचलली पालखी

    मुंबई : कितीही मतभेत असले, तरी एखाद्या कार्यक्रमात, समारंभात, व्यासपीठांवर किंवा सणांमध्ये राजकीय मतभेद सारून नेत्यांनी एकत्र येण्याची परंपरा महाराष्ट्राची आहे. सध्या महाराष्ट्राचे राजकारण अनेक बाजुंनी ढवळून निघाले असले तरी काही घटना राज्याची ही परंपरा आजही कायम असल्याचे दाखवून देतात. कोरोना महामारीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा प्रथमच धुमधडाक्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघालेल्या आहेत. याच प्रसंगी पुण्यातील गणपती विसर्जन सोहळ्यात शुक्रवारी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत अशा राजकीय परंपरेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

    पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सकाळी निघाली. त्याठिकाणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित होते. तेव्हाच आदित्य ठाकरे (Adity Thakery) ही याठिकाणी पोहोचले. हे दोन्ही नेते समोरासमोर आल्यावर काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना पाहून त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला. चंद्रकांतदादांनी आदित्य यांना गणपतीचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते. आदित्य ठाकरे येताच विसर्जनाला सुरुवात झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्रच कसबा गणपतीची पालखी खांद्यावर घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी गणरायाचा जयघोष केला. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता गणपती मिरवणुकीतील हे चित्र जनतेसाठी नक्कीच सुखावणारे होते.