‘कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःचा पक्ष स्थापन करा’; विद्या चव्हाण यांचे अजित पवारांवर टीकास्त्र

मी लेचापेचा नाही, असे पोकळ वक्तव्य करण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःचा पक्ष स्थापन करा, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सोडले.

    मुंबई : मी लेचापेचा नाही, असे पोकळ वक्तव्य करण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःचा पक्ष स्थापन करा, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सोडले.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर कर्जत येथे पार पडले. यावेळी अजित पवार मी लेचापेचा नाही, असे शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी देखील शरद पवार यांना लक्ष्य केले. यावर सविस्तर प्रत्युत्तर शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात दिले.

    विद्या चव्हाण यांनी आज मुंबईतून अजित पवारांवर निशाणा साधला. विद्या चव्हाण म्हणाल्या, अजितदादा पवार यांच्या मित्र मंडळांचे शिबिर पार पडले. या शिबिरात अजितदादा यांची अस्वस्थता भाषणांमधून दिसून आली आहे. अजितदादांवर भाजपकडून ज्याप्रकारे दबाव टाकण्यात येत आहे. तो दबाव अजितदादा यांच्या भाषणातून दिसून येत होता. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून अजितदादा यांना भाषणाची स्क्रिप्ट लिहून देण्यात आली होती.

    ट्रिपल इंजिन सरकार असूनही महाराष्ट्र सध्या अस्वस्थ

    ”आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीची रंगीत तालीम अजितदादा यांच्या कालच्या मित्रमंडळ शिबिरातून दिसून आली आहे. अजितदादा यांनी केलेले भाषण हे पूर्णपणे भाजपकडून दबाव टाकण्यात येत असल्याने करण्यात आले आहे. भाषणात अजितदादा बोलत असले तरी संपूर्ण भाषण भाजपच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असून, सुद्धा महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे”, असेही चव्हाण म्हणाल्या.