माजी सीईओ अरूण डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद : संजय रायमुलकर

माजी सीईओ अरूण डोंगरे (Arun Dongre) यांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांनी २०१५-१७ सालात उत्कृष्ठ कामगिरी केल्याचे गौरवद्गार चेअरमन संजय रायमुलकर यांनी काढले.

  कुर्डुवाडी : माजी सीईओ अरूण डोंगरे (Arun Dongre) यांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांनी २०१५-१७ सालात उत्कृष्ठ कामगिरी केल्याचे गौरवद्गार चेअरमन संजय रायमुलकर यांनी काढले.

  महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायतराज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांच्या पथकाने गुरुवारी माढा तालुक्यातील अरण गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळा, अंगणवाडी, शासनाचा आयुर्वेदीक दवाखाना तर पिंपळनेर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राची तपासणी करुन दुपारी दीडच्या सुमारास कुर्डुवाडी येथील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या सभागृहात २०१५-१६, २०१६-१७ चा लेखा परीक्षा पुनर्विलोकनाचा अहवाल व २०१७-१८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालाबाबत बंद दाराआड गोपनीय बैठक घेऊन कामाबाबत समाधान व्यक्त केले.

  पंचायतीराज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर, सदस्य शेखर निकम, रत्नाकर गुट्टे, कृष्णा गाजबे हे पंचायत समितीच्या आवारात येताच मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत फुलांच्या पायघड्या टाकून करण्यात आले.

  यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबन शिंदे यांनी विठ्ठल रूक्मिणीची प्रतिमा भेट देऊन समितीचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत विधिमंडळाचे अव्वर सचिव प्रकाशचंद्र खोंदले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, लेखा विभागाचे संचालक माधवराव नागरगोजे, विधिमंडळाचे प्रतिवेदक मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.

  सत्कारानंतर प्रत्यक्ष कामकाजास पंचायत राज समितीने सुरुवात केली. यावेळी बैठक संपेपर्यंत सभागृहाचे दार बंद ठेवण्यात आले होते. यामध्ये आढाव्यासंबंधित अधिकारी सोडून इतर कुठलाही कर्मचारी किंवा सर्वसामान्यांना प्रवेश दिला नाही. दीड तासाच्या कालावधीत बैठक संपल्यानंतर पंचायत राज समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी येथील एका खासगी हाॅटेलमध्ये भोजनाचा आस्वाद घेऊन करमाळ्याकडे या समितीने प्रयाण केले.

  यावेळी येथील पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आपापल्या ड्रेसकोडवर गळ्यात ओळखपत्र लटकाऊन खूप दिवसानंतर उपस्थित होते. करमाळ्याकडे जाताना माढा तालुक्यातील रोपळे क ग्रामपंचायतीने १० हजार झाडांचे वृक्षारोपण करुन निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईला भेट देत ग्रामस्थांचे कौतुक केले आणि पथकाच्या माध्यमातून ५० हजार रोपे देण्याचे आश्वासन दिले.

  माढा पंचायत समितीची इमारत पाहून पथकाने कौतुक केले. तर अरण येथे शालेय पोषण आहार, धान्याच्या मालाचे वजन तपासले त्यावरील लेबलची पडताळणी केली. विद्यार्थ्यांशी हितगुज केली. तर पिंपळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषोधोपचाराबाबत तपासणी करत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.