महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाला विरोध

नाना पटोले यांनी राहुल गांधी बिनविरोध काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे हा प्रस्ताव मांडला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यावेळी उपस्थित इतरांनी देखील हात वर करून समर्थन दिले. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी हात वर केला नाही.

    मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद (Congress President) स्वीकारावे असा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Congress) मंजूर केला आहे. मात्र, या बैठकीत राहुल गांधी यांच्या बिनविरोध काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या ठरावाला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

    देशातील अनेक राज्यांमधून राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष व्हावे यासाठी ठराव मंजूर केले आहेत. मात्र, महाराष्ट्रात या प्रस्तावाला पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीत समर्थन दिले नाही. नाना पटोले (Nana Patole) यांनी राहुल गांधी बिनविरोध काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे हा प्रस्ताव मांडला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यावेळी उपस्थित इतरांनी देखील हात वर करून समर्थन दिले. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी हात वर केला नाही.

    पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका ही काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी; तसेच राहुल गांधी यांनी निवडणुकीत भाग घ्यावा अशी आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. १७ ऑक्टोबरला निवडणुका होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.