श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री ‘टार्गेट’; नामोल्लेख न करता शेलारांची टीका

मुंबईत आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या मेहक प्रभूला २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी क्लीनचिट दिली होती. तर, उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली, असे सांगून या हत्याकांडातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न अमरावती पोलीस करत होते. पोलिसांवर दबाव अमरावतीच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता, असा आरोप भाजपने केला आहे.

    मुंबई : श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walkar Murder) प्रकरणाचा विशेष पोलीस पथकाच्या (Special Police Force) माध्यमातून तपास करण्यात येणार आहे. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आंतरधर्मीय विवाहामध्ये तरुणींचा होणारा शारीरिक आणि मानसिक छळ रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधात (Love Jihad) कठोर कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यातच श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून मंत्री, सत्ताधारी आमदारांकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्वीटद्वारे नामोल्लेख न करता निशाणा साधला आहे.

    मुंबईत आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या मेहक प्रभूला २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी क्लीनचिट दिली होती. तर, उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली, असे सांगून या हत्याकांडातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न अमरावती पोलीस करत होते. पोलिसांवर दबाव अमरावतीच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता, असा आरोप भाजपने केला आहे.

    ‘आझाद काश्मीरवाल्या मेहक प्रभूला जे क्लीनचीट देतात. उमेश कोल्हेचा गळा चिरणाऱ्यांना संरक्षण देतात? त्यांना श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्येची हळहळ वाटू नये? काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही. मुंबईकर हो, आता तुम्ही सांगा यांना मराठी म्हणावे की नाही?’ असे शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.