‘काँग्रेसने देश बांधला पण भाजपने देश विकला, आरएसएसने तर…’; माजी न्या. कोळसे पाटील यांची टीका

आमचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वाकडं नाही. समाजा-समाजात द्वेषभावना निर्माण करण्याचे काम ही संघटना करत आहे. यामुळे या विषवल्लीच्या विरोधात आमचा लढा आहे.

    नागपूर : भारत 2014 पूर्वीचा वेगळाच होता. तो काँग्रेसने बांधला होता. मात्र, 2014 नंतरचा भारत वेगळा असून, भाजपने (BJP) देश विकला, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील (B.J.Kolase Patil) यांनी व्यक्त केले.

    पहिले पंतप्रधान नेहरू यांच्यापासून तर इंदिरा गांधी यांच्यापासून तर मनमोहन सिंग यांच्या पर्यंतचा 2014 पूर्वीचा भारत वेगळा होता, याचा उल्लेखही त्यांनी केला. सिव्हील लाइन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राजकीय परिषदेत ते बोलत होते.

    ‘आर्थिक लोकशाही आमचा मुलभूत अधिकार आहे’, हा या परिषदेचा विषय होता. कोळसे पाटील म्हणाले, मागील 70 वर्षात केवळ 54 लाख कोटीचे कर्ज देशावर होते, तर आठ वर्षांत 200 लाख कोटीचे कर्ज या सरकारने केले, असा ठपका सरकारी यंत्रणेकडूनच ठेवण्यात आला आहे. मात्र, ज्या यंत्रणेकडून हा ठपका ठेवला जातो, त्यांची थेट बदली होते.

    संघ द्वेष निर्माण करणारी संघटना

    आमचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वाकडं नाही. समाजा-समाजात द्वेषभावना निर्माण करण्याचे काम ही संघटना करत आहे. यामुळे या विषवल्लीच्या विरोधात आमचा लढा आहे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील शोषणमुक्त समाज निर्मिती हे आमचे ध्येय आहे.

    इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण

    इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, तर मोदी सरकार खासगीकरण करत आहेत. यामुळे प्रत्येक पातळीवर भाजपच्या अर्थात मोदीच्या आठ वर्षांच्या काळातील चिरफाड करण्याची वेळ आली आहे. एकीकडे कोविडमुळे देश मृत्यूच्या खाईत लोटत होता, तर मोदी सरकार मात्र 20 हजार कोटींच्या ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाच्या उभारणीत होते.