चिपळूणच्या माजी आमदारांनी तोडले शिवबंधन; शिंदे गटाला पाठिंबा

मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सदानंद चव्हाण सक्रिय राजकारणापासून दूर होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चिपळूण विधानसभा मतदारसंघावरील त्यांची पकड ढिली झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत होते, मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे ते शांत होते. 

    मुंबई : चिपळूणचे (Chiplun) माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand Chavan) यांनी अखेर शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र (Jai Maharashtra) केले आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन त्यांच्या गटाला पाठिंबा दिला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा ते निवडून आले होते. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी २००४ मध्ये पक्ष सोडल्यानंतर चिपळूणमध्ये संपलेली शिवसेना मी उभी केली, असा दावा ते वारंवार करत होते.

    मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सदानंद चव्हाण सक्रिय राजकारणापासून दूर होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चिपळूण विधानसभा मतदारसंघावरील त्यांची पकड ढिली झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत होते, मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे ते शांत होते.

    संघटनेच्या बैठकांसाठी आणि कार्यक्रमासाठीही त्यांना डावलले जात असल्यामुळे चव्हाण नाराज होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन भाजपबरोबर हात मिळवणी केली आणि राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर चिपळूणमध्ये शिवसैनिकांनी तातडीची बैठक घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी सदानंद चव्हाण संघटनेबरोबर होते, मात्र नंतरच्या काळात सदानंद चव्हाण यांनी स्वतंत्र बैठक घेऊन पक्ष संघटनेवरील नाराजी बोलून दाखवली. त्याचवेळी सदानंद चव्हाण हे पक्षावर आणि नेतृत्वावर नाराज असून, ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

    अखेर त्यांनी शिवबंधन तोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, उपतालुकाप्रमुख अभय सहस्त्रबुद्धे, अनंत पवार, संदेश आयरे, विभागप्रमुख बळीराम चव्हाण, सदाभाऊ पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.