शेतकऱ्यांची एकजूट का नाही? ; माजी खासदार राजू शेट्टी यांचा सवाल

    वडूज : मागील अनेक वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकरी ऊसाला चांगला दर मिळावा, या प्रतीक्षेत असून सरकार व कारखानदार यावर ठोस निर्णय घेत नाहीत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाला तीन हजारांहून अधिक दर देतात. मात्र सातारा जिल्ह्यात साखर कारखानदार ऊस दराबाबत उदासीनता दाखवत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात कमी दर देवुन गळचेपी करत आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी या जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र येत असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या ऊस दरासाठी एकत्र येऊन साखर कारखानदारांना आपली एकसंघ ताकद दाखविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

    कातरखटाव येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सातारा जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख, राजेंद्र माने, तालुकाध्यक्ष दत्‍तात्रय घाडगे, सुर्यभान जाधव, सुर्यकांत भुजबळ, प्रमोद देवकर, लावंड, सचिन पवार, शरदशेठ खाडे, पृथ्‍वीराज गोडसे, राजीव मुळीक, राजू फडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला.
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेले ऊस तोड बंद आंदोलन शेतकरी, ऊस वाहतूकदार आणि साखर कारखानदारांच्या मागण्यासाठी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेवू नयेत, ऊस वाहतूकदारांनी वाहतूक करू नये आणि कारखानदारांनी कारखाने बंद ठेवावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

    शेट्टी म्हणाले, यंदा सांगली जिल्ह्यातील कारखाने ३० मार्चच्या पुढे चालणार नाहीत, असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनीही दोन दिवस तोडी घेवू नयेत. दरवर्षी कोट्यवधीचा गंडा मजूर आणि मुकादम घालत आहेत. त्याला आळा बसण्यासाठी ऊस मजूर महामंडळाची स्थापना करावी, त्याच्या मार्फत मजूर पुरवावेत, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करावी, महामंडळाला निधी जमा करण्यासाठी प्रति टन १० रुपये कपात करावी, गंडा घालणाऱ्या मजुरांचा शोध घेण्यासाठी राज्यव्यापी पोलीस पथक नियुक्त करावे, आदी मागण्या वाहतूकदारांच्या आहेत.  साखरेची किंमत गेली चार वर्षे ३१ रुपयेच आहे. त्यामुळे जादा दर शेतकऱ्यांना देता येत नाही, हे साखर कारखानदारांचे दुखणे आहे. त्यामुळे साखरेचा भाव प्रति किलो ३५ रुपये करावा, इथेनॉलचा भाव प्रति लिटर ६५ रुपये करावा, साखर कारखान्यांना नाबार्डकडून थेट साखर कारखान्यांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करावा, आदी मागण्यासाठी ऊस तोड बंद आंदोलन पुकारले आहे.

    या आहेत प्रमुख मागण्या
    एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा कायदा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत आदीसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

    प्रतिसाद मिळाल्यास केंद्र सरकार झुकेल
    संघटनेने केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारलेले नाही. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी तर आहेच पण ऊस वाहतूकदार आणि साखर कारखानदार यांच्याही हिताचे आहे. महाराष्ट्र हा देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी ४० टक्के साखरेचे उत्पादन करतो. त्यामुळे सांगली जिल्ह्यासह राज्यात या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला तर केंद्र सरकारही झुकेल त्यामुळेच आता नाही तर कधीच नाही या भावनेने सर्वांनीच या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

    जिल्ह्यातील ऊस तोडी व वाहतूक बंद ठेवण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. वाहतुकदार व कारखानदारांनी प्रतिसाद नाही दिला तर जिल्हात आगडोंब उसळेल आणि होणाऱ्या परिणामास संबंधित जबाबदार राहतील

    -अनिल पवार, राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना