पाच महिन्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंची तिहार तुरुंगातून सुटका

जुलैमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली होती. 2009 ते 2017 या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे

    मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांची बुधवारी रात्री तिहार तुरुंगातून (Tihar Jail) सुटका करण्यात आली. पांडे यांना जुलैमध्ये अटक झाल्यानंतर त्यांनी जवळपास पाच महिने तुरुंगात काढले. दिल्ली कोर्टाने (Delhi Court) नुकताच त्यांना जामीन मंजूर केला होता.

    संजय पांडे यांच्यावरील आरोप

    अंमलबजावणी संचालनालय (ED) ने या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्ली कोर्टात NSE कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. जुलैमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली होती. दरम्यान, ED ने या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंगशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. एनएसईचे माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

    “फोन टॅपिंगमध्ये पैसे लाँडर केले गेले. फोन टॅपिंगमध्ये केलेले पेमेंट कथितपणे गुन्ह्यातून मिळालेले पैसे आहेत. शेल कंपन्या होत्या ज्यांच्या माध्यमातून पैसे लाँडर केले गेले,” असे आरोपपत्रात म्हटले आहे. ईडीने दावा केला आहे की रामकृष्णला मदत करण्यासाठी एमटीएनएल लाइन टॅप करण्यासाठी पांडेला 4.54 कोटी रुपये मिळाले होते आणि ही रक्कम गुन्ह्यातील होती.

    संजय पांडेंच स्पष्टीकरण

    आपण फोन टॅपिंग केले, पण कोणतेही बेकायदेशीर काम केले नाही, असे पांडे म्हणाले होते. टॅपिंगसाठीची सर्व उपकरणे एनएसईने पुरविली होती, असे ते म्हणाले. ईडीचे प्रकरण केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार नोंदवलेल्या सीबीआय एफआयआरवर आधारित आहे.