माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली. ते या पदावर २००७ ते २००८ या काळात होते आणि निवृत्त झाले.

    पुसेगाव : पुसेगावचे सुपुत्र व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव (वय ७४) यांचे अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता. त्यांचा अंत्यविधी आज साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

    कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या धनंजय जाधव यांनी पोलीस दलात अनेक पदं भूषवली.धनंजय जाधव यांचे मुळ गाव खटाव तालुक्यातील पुसेगाव. याच ठिकाणी १९४७ मध्ये त्यांचा जन्म झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. त्यानंतर त्यांनी MSc ची पदव्युत्तर पदवी घेतली.प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. १९७२ ला ते युपीएससीची परीक्षा पास झाले आणि IPS म्हणून धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं. पुणे येथे DCP म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली.

    काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली. ते या पदावर २००७ ते २००८ या काळात होते आणि निवृत्त झाले.