माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील घरून करणार मतदान; वयामुळे करणार घरुन मतदान

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यात घरुन मतदान करणार आहेत.

    पुणे: यंदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांसह अपंग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यात घरुन मतदान करणार आहेत. त्यासाठी आवश्यक १२ ड फॉर्म जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे.

    कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत त्यांचे नाव असल्यामुळे घरुन मतदान करण्याकरीता १२ ड फॅार्म प्रतिभा पाटील यांनी भरून दिला आहे. त्याला मंजुरी देण्यात आला आहे. ८५ पेक्षा जास्त वय असलेले नागरीक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या नागरिकांसाठी यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत घरुन मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने आणली आहे. त्याअंतर्गत १२ड हा अर्ज भरुन संबधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. याच योजनेअंर्तगत प्रतिभा पाटील यांनी घरुन मतदान करण्यासाठी अर्ज दिल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

    कोथरुड विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत त्यांचे नाव आहे. प्रतिभा पाटील यांचे ८९ वय आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नसल्यामुळे त्यांना घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. १३ मे या मतदान दिवसाच्या पूर्वसंध्येला १२ मे रोजी निवडणूक अधिकारी घरी जाऊन टपाली मतदानाप्रमाणे त्यांचे मतदान करुन घेणार आहेत. या मतदानाचे चित्रिकरण होणार आहे.