मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून माजी सरपंचाची आत्महत्या

  पिंपरी : मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून माजी सरपंच असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. आळंदी येथे शुक्रवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला.

  पुण्यात मुलाकडे वास्तव्यास आलेले 

  व्यंकट नरसिंग ढोपरे (६५) असे आत्महत्या केलेल्या माजी सरपंचांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकट ढाेपरे हे लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा या गावचे माजी सरपंच आहेत. नऱ्हे आंबेगाव येथे वास्तव्यास असलेला मुलगा संदीप ढोपरे याच्याकडे व्यंकट ढोपरे आले होते.

  मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल

  दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपाषेण, आंदोलन, मोर्चे निघत असताना व्यंकट ढोपरे यांनी टोकाचे पाऊल उचचले. आळंदीला दर्शनासाठी जाऊन येतो, असे सांगून ढोपरे हे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरून निघाले. दुपारी तीनच्या सुमारास ढोपरे यांचे कपडे धुताना घरच्यांना चिठ्ठी सापडली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.

  अग्निशामक दलाला सापडला मृतदेह

  त्यावेळी रात्री आठच्या सुमारास इंद्रायणी नदी घाटावर ढोपरे यांची पिशवी व इतर साहित्य मिळून आले. त्यामुळे अग्निशामक दलाने रात्रीच ढोपरे यांचा इंद्रायणी नदीपात्रात शोध सुरू केला. रात्रभर तसेच शनिवारी सकाळी देखील शोध सुरू असताना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास मृतदेह नदीत मिळाला. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

   

  काय आहे चिठ्ठीमध्ये?

  मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. खूपवेळा सरपंच या नात्याने माझ्या मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावातील सर्व जातीधर्माच्या समाजाला घेऊन बऱ्याचवेळेस मोर्चामध्ये सहभाग घेऊन संघर्ष केला पण सरकारला त्याबद्दल आतापर्यंत दया आली नाही.

  माझ्या मुलाचा कृषीखात्यात २०१२ ला अनुकंपातत्वाखाली माझ्या पत्नीच्या वडिलांच्या जागी प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर कागदपत्रे कृषी संचालक कार्यालयात जमा करा, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. तरीसुद्धा आजीआजोबांच्या जागेवर नोकरी देता येत नाही, अशी पत्राव्दारे माहिती दिली. ती जागा आमच्या हक्काची असून त्याची पूर्ण फाइल माझ्यागावी घरी कपाटात आहे. अधिकाऱ्यांच्या अपेक्षेपोटी आम्ही डावलले गेलो. आमच्या पदरी निराशा टाकण्यात आली. आजरोजी माझा मुलगा बेकार फिरत आहे.

  मी सरपंच या नात्याने २०२१ ला २०२१ ला ६५ वर्षीय निराधार लोकांच्या पगारासाठी शिरूर अनंतपाळ तहसीलदारांकडे ५० ते ६० लोकांचे पेपर देऊन देखील त्या गरीब लोकांचे पगार शासन व प्रशासनाने केले नाहीत. हे शासन प्रशासन स्वत:ची खळगी भरण्यात व्यस्त आहेत. जनतेला न्याय भेटत नाही. या निराशेपोटी मी माझी आहुती देत आहे.