पाचशे रुपयांच्या नोटांचा बंडल सापडला, क्षणात परत करण्याचा निर्णय घेतला; प्रा. सोनवणे यांचं होतंय कौतुक

सिन्नर महाविद्यालयासमोर प्रा. श्रीकृष्ण सोनवणे यांना ५० हजार रुपये सापडले. पैसे हरवलेल्याचा शोध घेत त्यांनी ते पैसे परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. सोनवणे हे महामार्गाने जात असताना त्यांना महामार्गाच्या कडेला ५०० रुपयांच्या नोटांचा ५० हजारांचा एक बंडल पडलेला दिसला.

    सिन्नर : सिन्नर महाविद्यालयासमोर प्रा. श्रीकृष्ण सोनवणे यांना ५० हजार रुपये सापडले. पैसे हरवलेल्याचा शोध घेत त्यांनी ते पैसे परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. सोनवणे हे महामार्गाने जात असताना त्यांना महामार्गाच्या कडेला ५०० रुपयांच्या नोटांचा ५० हजारांचा एक बंडल पडलेला दिसला. त्यांनी आसपास सर्वत्र बघितले. मात्र, पैसे कुणाचे असावे याबाबत त्यांना कळत नव्हते. त्यानंतर सोनवणे यांनी जवळच असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातील शाखा प्रमुखांना याबाबत माहिती दिली.

    बँकेतून पैसे काढून नेलेल्या एखाद्या ग्राहकाचेच हे पैसे असावेत असा विचार करत बँकेत येऊन गेलेल्या ग्राहकांचा त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळात प्रकाश भट हे बँकेत आले. भट यांनी काही वेळापूर्वीच बँकेतून पैसे काढले होते. मात्र, घरी जाताना त्यांच्याकडून नकळत पैसे रस्त्यावर पडले. घरी गेल्यावर त्यांना पैसे पडल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ आलेल्या रस्त्याने सर्वत्र शोध घेतला. मात्र, रस्त्यात कुठेही पैसे न सापडल्याने त्यांनी बँकेत धाव घेतली.

    तेथे प्रा. सोनवणे यांना पैसे सापडल्याची माहिती त्यांना मिळाली. सर्व बाबींची खात्री केल्यानंतर शाखाप्रमुखांनी भट यांच्या ताब्यात पैसे दिले. पैसे परत मिळाल्याने भट यांनी प्रा. सोनवणे यांचे आभार मानले. या घटनेमुळे अजूनही समाजात प्रामाणिकपणा असल्याचे उपस्थितांनी म्हटले.