कोरेगाव भीमात ॲट्रॉसिटी प्रकरणी चौघांवर गुन्हे

 एका युवकाला दुकानात घुसून केली जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण

    शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूरच्या सरपंच रमेश गडदे यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना ताजी असताना आता कोरेगाव भीमा येथील एका युवकाला दुकानात घुसून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शुभम वाळके यांच्या सह चौघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    कोरेगाव भीमा येथील जयदीप उर्फ राकेश पोटे हा त्याच्या कुशनचे दुकानात असताना एक इसम सायंकाळच्या सुमारास दुचाकीचे शीट कव्हर बसवण्यासाठी आला, मात्र जयदीप याच्या पत्नीने त्याला औषध घेऊन येण्यास सांगितल्याने जयदीप घरी गेला त्यामुळे दुचाकीला शीट कव्हर बसवण्यास उशीर झाल्याने सदर दुचाकी चालक शुभम वाळके याने जयदीपला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली त्याचवेळी शुभम याने त्याच्या काही मित्रांना फोन करुन बोलावून घेतले त्यावेळी त्याचे तीन मित्र सदर ठिकाणी आले त्यांनी देखील दुकानात घुसून जयदीपला जातीवाचक, शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी जयदीपच्या मामाचा मुलगा विशाल कांबळे भांडणे सोडवण्यास आला असता त्याला देखील जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली, घडलेल्या प्रकाराबाबत जयदीप उर्फ राकेश विजय पोटे वय २१ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शुभम वाळके रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे तसेच तीन अनोळखी युवक ( पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्या विरुद्ध मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी हे करत आहे.