सांगलीत साडेचार लाखांच्या बनावट नोटा हस्तगत, कोल्हापूर जिल्ह्यातील तीन संशयीत जेरबंद ; विश्रामबाग पोलिसांची कारवाई

सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील कल्पद्रूम क्रीडांगणाजवळ ४ लाख ३८ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेवून थांबलेल्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. हस्तगत केलेल्या सर्व नोटा पाचशे रुपयांच्या आहेत. या नोटा तिघांनी कोठे तयार केल्या किंवा कोणाकडून आणल्या.

    सांगली : सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील कल्पद्रूम क्रीडांगणाजवळ ४ लाख ३८ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेवून थांबलेल्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. हस्तगत केलेल्या सर्व नोटा पाचशे रुपयांच्या आहेत. या नोटा तिघांनी कोठे तयार केल्या किंवा कोणाकडून आणल्या.  यापूर्वी त्यांनी काही नोटा चलनात आणल्या आहेत का ? याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
    अटक करण्यात आलेल्यांमध्ये वाहीद रफिक पठाण (वय २३, रा. यादव नगर, जयसिंगपूर), जमीर शौकत बागवान (वय ३८, इरगोंडा पाटील नगर, कबनुर, इचलकरंजी) आणि संतोष श्रीकांत हत्ताळे (३२, संगमनगर, तारदाळ, हातकणंगले) यांचा समावेश आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
    विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गुरुवारी सकाळी गस्तीवर होते. त्यावेळी कल्पद्रूम क्रीडांगणाजवळ तिघेजण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले.  सहायक निरीक्षक पल्लवी यादव अधिक तपास करीत आहेत.

    पाचशे रुपयांच्या नोटांचे काही गठ्ठे
    पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत पाचशे रुपयांच्या नोटांचे काही गठ्ठे आढळून आले. याबाबत चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलीस चौकशीत पाचशेच्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्या नोटा बाजारपेठेत खपवण्यासाठी आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.