टेम्पोची काच फोडून रोकड लुटणाऱ्या चौघांना अटक, भुईंज पोलिसांची कारवाई; ‘असा’ झाला चोरीचा उलघडा

आसले (ता. वाई) येथे बंद टेम्पोची काच फोडून १ लाख ४ हजार ५७५ रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेणाऱ्या चार संशयित आरोपींना भुईंज पोलिसांनी अटक केली.

    सातारा : आसले (ता. वाई) येथे बंद टेम्पोची काच फोडून १ लाख ४ हजार ५७५ रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेणाऱ्या चार संशयित आरोपींना भुईंज पोलिसांनी अटक केली. राहुल अंकुश गोळे (वय २६, रा. जानकर कॉलनी, मंगळवार पेठ), ओमकार रमेश गोळे (वय १८, रा. जानकर कॉलनी, मंगळवार पेठ), अभिजीत अंकुश गोळे (वय ३४, रा. जानकर कॉलनी, मंंगळवार पेठ), मयूर आनंदराव किर्दत (वय ३२, करंजे, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.

    दिनांक ३० रोजी सकाळी नऊ वाजता फिर्यादी व त्यांचे साथीदार गोळे व किर्दत यांच्यासोबत मेडिकल औषधच्या बॉक्सेसची विक्री करून त्यांनी १ लाख चार हजार ५७५ रुपये एका बॅगमध्ये ठेवले होते. हे तिघेजण टेम्पोमधून वाई पाचवडमार्गे निघाले असताना आसले गावच्या हद्दीत एका शेतामध्ये मद्यपानासाठी गेले होते. यावेळी त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. यावेळी टेम्पोची डाव्या बाजूची काच फोडृून टेम्पोतील बॅग चोरी केली होती. याबाबत भुईंज पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांना तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले होते.

    साथीदारांच्या मदतीने चोरीचा बनाव

    तासगावकर यांनी फिर्यादी आणि त्यांचे साथीदार यांच्याकडे सखोल चौकशी केली. तपासत फिर्यादी सोबत असलेले साथीदार गोळे व किर्दत यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांबरोबरच चोरीचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले होते. त्या दोघांनी संगनमताने अन्य दोघांच्या साह्याने रक्कम चोरल्याचे समोर आले. संशयितांना भुईंज पोलिसांनी तत्काळ अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच चोरीला गेलेली एक लाख चार हजार रुपयाची रक्कमही जप्त करण्यात आली.