फलटणमध्ये चार कारखान्याच्या ताेडी बंद; शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यावर्षीच्या ऊस गळीत हंगामातील आणि ऊस उत्पादकांच्या नेहमीच्या काही प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोड व ऊस वाहतूक लाक्षणिक बंद आंदोलन पुकारण्यात आले असून, फलटण तालुक्यातील सर्व चारही साखर कारखान्यांवरील ऊस तोडणी, वाहतूक बंद ठेवण्यात यश आल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी सांगितले.

  फलटण : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यावर्षीच्या ऊस गळीत हंगामातील आणि ऊस उत्पादकांच्या नेहमीच्या काही प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोड व ऊस वाहतूक लाक्षणिक बंद आंदोलन पुकारण्यात आले असून, फलटण तालुक्यातील सर्व चारही साखर कारखान्यांवरील ऊस तोडणी, वाहतूक बंद ठेवण्यात यश आल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी सांगितले.

  फलटण तालुक्यातील साखर कारखान्यातील आजच्या गाळपा विषयी माहिती घेतली असता, आंदोलनाचा परिणाम काही प्रमाणात झाला असला तरी संततधार पावसाने गळीत हंगाम उशीरा सुरु झाले आहेत. या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. रविंद्र घाडगे, युवक राज्य प्रवक्ता प्रमोद गाडे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऊस तोडणी वाहतूक उद्या ही बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी व कारखानदार यांना केले आहे.

  ताेड नाकारल्यास पुन्हा मिळणार का?

  पावसाने अनेक ठिकाणी ऊसाचे नुकसान झाल्याने तोडी मिळताच ऊस गाळपासाठी घालविण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी प्रयत्नशील आहेत, तथापि त्यांची स्वाभिमानीच्या आंदोलनाला साथ नाही, असे म्हणता येणार नाही. ऊसाची आलेली तोड नाकारली तर पुन्हा केंव्हा मिळणार याची खात्री नसल्याने काही ठिकाणी तोडी व वाहतूक सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले.

  शेतकरी, चालकांची आंदाेलकांना साथ

  दरम्यान स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक रोखल्यावर वाहने जाग्यावर थांबविण्यास कोणीही शेतकऱी व वाहन चालकांनी विरोध न करता स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना साथ दिल्याचे दिसून आले. किंबहुना उद्या वाहतूक बंद ठेवण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.