चिंताजनक! राज्यात वाढत आहेत चिकनगुनियाचे रुग्ण; चौपट वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट

राज्यातील चिकनगुनिया रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे.

    पुणे : राज्यातील बदलत्या वातावरणाचा परिणाम हा अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. राज्यातील चिकनगुनिया रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा चिकनगुनियाचे रुग्ण चौपट वाढलेले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने अहवाल सादर केला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार रुग्ण चौपट वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    चिकनगुनिया हा रोग ‘एडीस’ जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरतो. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात. तसेच जनजागृती देखील केली जाते. मात्र तरी देखील यंदा चिकनगुनिया रोगाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. राज्यातील सर्व जिल्हे व महापालिका हद्दीत 1 जानेवारी 2023 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान चिकनगुनियाच्या 4 हजार 193 संशयित रुग्णांच्या तपासणीपैकी 97 रुग्णांमध्ये या आजाराचे निदान झाले. या वर्षी 1 जानेवारी 2024 ते 14  एप्रिल 2024 दरम्यान राज्यात 5 हजार 816 संशयितांपैकी 400 रुग्णांमध्ये चिकनगुनियाचे निदान झाले. त्यामुळे मागील वर्षीहून हे रुग्ण चारपट वाढलेले दिसत आहेत.

    राज्यातील महापालिका भाग वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी 2023 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान 754 संशयितांपैकी 57 रुग्ण आढळले आहेत. तर 1 जानेवारी 2024 ते 14 एप्रिल 2024 दरम्यान 2 हजार 210 संशयितांपैकी 275 रुग्णांमध्ये चिकनगुनियाचे निदान झाले. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने या आकडेवारीला दुजोरा देखील दिला आहे.