त्यांना कुठं माहिती होतं हे त्यांचं शेवटचं दर्शन असेल, चौघे अंगारकी निमित्त बाप्पाच्या दर्शनाला गेले, परतले फक्त दोघे; वाचा नेमकं काय घडलं ?

दरम्यान, या अत्यंत दुर्दैवी अपघातात तरुणांचा जीव गेल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे तरुण दुचाकीवर राजूरला गेले होते व राजूरहून भोकरदन कडे येत असताना राजूर-भोकरदन रस्त्यावरील टेपले पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

  जालना : श्रीक्षेत्र राजुर गणपती येथून श्री गणेशाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भोकरदन शहरातील तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील हे चौघेही तरुण गणपतीच्या दर्शनासाठी एकाच मोटर सायकलवर गेले होते.

  -चौघे तरुण एकाच दुचाकीवर स्वार

  आज मंगळवारी अंगारिका चतुर्थी असल्याने भोकरदन शहरातील चौघे तरुण एकाच दुचाकीवर गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. मध्यरात्री दर्शन झाल्यानंतर भोकरदनकडे येत असताना पहाटे 4 वाजेच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात भोकरदन येथील फत्तेपूर रस्त्यावरील निलेश हिरालाल चव्हाण (वय २०) आणि प्रशांत आरके (वय २१) हे दोन तरुण जागीच ठार झाले. तर अनिकेत बाळू वाहुळे (वय 19) आणि आरेफ सलीम कुरेशी (वय 22, रा. नवे भोकरदन) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  -अपघातात तरुणांचा जीव गेल्याने शहरात हळहळ

  दरम्यान, या अत्यंत दुर्दैवी अपघातात तरुणांचा जीव गेल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे तरुण दुचाकीवर राजूरला गेले होते व राजूरहून भोकरदन कडे येत असताना राजूर-भोकरदन रस्त्यावरील टेपले पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये निलेश चव्हाण व प्रशांत आरके हे दोघे जागीच ठार झाले.घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. अपघात स्थळावरून तरुणांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून प्रशांत व निलेश यांना मृत घोषित केले. तर अनिकेत वाहूळे व आरेफ कुरेशी यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून जालना येथे हलविले. मात्र दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना यानंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले. या प्रकरणात राजूर पोलीस चौकीत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  दरम्यान, अंगारकी चतुर्थी असल्याने हजारो भाविक दर्शनासाठी राजूरला पायी जात होते. अपघात झाला त्यावेळी या भाविकांनी सुध्दा अपघातातील जखमींना मदत केली. अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. मात्र, पोलिसांनी या गर्दीला आटोक्यात आणले.