वरळी येथे सिलेंडर स्फोटात चार जण जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

    मुंबई, वरळी (warli) येथील बीडीडी चाळ क्रमांक ३ मधील घरात गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder blast) झाल्यामुळे कुटुंबातील चार सदस्य भाजून जखमी झाले. त्यात चार महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नाय़र रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
    गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक ३ च्या पहिल्या मजल्यावर मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास गॅस गळती होऊन सिलेंडर स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण चाळ हादरली.

    स्फोटाच्या आावाजाने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. काही रहिवाशांनी सावधानता बाळगत तात्काळ धाव घेतली. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरु केले. स्फोटामुळे घराला आग लागली. या आगीत घरात राहणारे आनंद पुरी (२७), मंगेश पुरी (४ महिने) व विष्णू पुरी (५) विद्या पुरी (२५) हे भाजले असून त्यातील आनंद पुरी (२७) व मंगेश पुरी या चार महिन्यांच्या बाळाची स्थिती गंभीर असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. सकाळी सातच्या सुमार आग लागल्यानंतर घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. आग विझवण्यात आली आहे.

    मात्र, आगीमध्ये कुटुंबातील चार सदस्य भाजले आहेत. त्यांना स्थानिक नागरीक नायर रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गॅस गळतीमुळे ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस व अग्निशमन दलाकडून केला जातो आहे.