नागपुरात अतिवृष्टीनंतर पूर, अर्धांगवायू झालेल्या महिलेसह चार जणांचा मृत्यू! ऑरेंज अलर्ट जारी

नागपूरमध्ये काही तास मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर शहरातील अनेक भाग जलमय झाले. बचाव कर्मचार्‍यांनी 400 हून अधिक लोकांना पुरातून वाचवले, ज्यात मूकबधिरांच्या शाळेतील 70 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

    नागपुरात शनिवारी अतीवृष्टी झाली. नदी नाल्यांना पूर (Nagpur Flood) आल्याने जनजीवन विस्कळीत झालं. यामुळे आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  पुरात 53 वर्षीय अर्धांगवायू झालेल्या महिलेसह चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. तर, आज सकाळी नागपुरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

    पुरामळे चार जणांचा मृत्यू

    नागपुरातील सुरेंद्रगड परिसराला पुराचा फटका बसला. संध्या ढोरे यांच्या घरी पुराचे पाणी घुसले त्यांच्यासोबत त्यांची आई सयाबाई ढोरे (72) राहतात. नातेवाईकांनी सयाबाईंना वाचवले, मात्र, अर्धांगवायू झालेल्या संध्याला वाचवता आले नाही.
    तर, दुसऱ्या घटनेत गिट्टी खदान परिसरात एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय मीराबाई कप्पूस्वामी यांचा रात्री दोनच्या सुमारास घरात पाणी शिरल्याने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील चौकाजवळील नाल्यात शनिवारी सायंकाळी एक अनोळखी मृतदेह आढळून आला.
    चौथे प्रकरण अयोध्या नगर परिसरातून समोर आले आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात पहाटे ३ वाजता पाण्यात बुडून येथे राहणारे ५२ वर्षीय चहा विक्रेते संजय शंकर गाडेगावकर यांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, तो एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जीएमसीएचमध्ये आला होता. याप्रकरणी अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट

    नागपूरमध्ये काही तास मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर शहरातील अनेक भाग जलमय झाले. बचाव कर्मचार्‍यांनी 400 हून अधिक लोकांना पुरातून वाचवले, ज्यात मूकबधिरांच्या शाळेतील 70 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शनिवारी पहाटे 2 ते 4 दरम्यान शहरात सुमारे 90 मिमी पाऊस पडल्यानंतर घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरले आणि रस्ते नद्यासारखे दिसू लागले. हवामान खात्याने येत्या २४ तासात जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

    उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पूरग्रस्त भागाला दिली भेट

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी नागपुरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय त्यांनी घरोघरी जाऊन पूरग्रस्त कुटुंबांशी संवाद साधला. ते म्हणाले की राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि त्याचे राज्य समकक्ष SDRF विदर्भातील सर्वात मोठ्या शहरात मदत आणि बचाव कार्य करत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी सकाळी अंबाझरी तलावाच्या परिसरात पाहणी केली. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.