मंत्रीमंडळात चार महीलांना मंत्रीपदाची संधी दिली पाहिजे; भाजपा प्रदेशध्यक्षा चित्रा वाघ यांची मागणी

राज्याच्या मंत्रिमंडळात किमान ३ ते ४ भाजपा आमदार महिलांना मंत्री पदाची संधी दिली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

  सोलापूर : राज्याच्या मंत्रिमंडळात किमान ३ ते ४ भाजपा आमदार महिलांना मंत्री पदाची संधी दिली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत केली आहे. चित्रा वाघ या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त केले.

  पूढे बोलताना वाघ म्हणाल्या की, आमच्याकडे कॅलिबर महिला आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात १०० टक्के महिलांना संधी द्या, असं चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

  आपल्याकडे महिलेलाच महिला बालकल्याण खातं दिलं जातं. पहिल्यांदाच पुरुषाला महिला बाल कल्याण खातं देण्यात आलं आहे. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. पुरुषांनाही कळू द्या महिलांच्या समस्या काय आहे. या निमित्ताने महिलांच्या समस्या पुरुषांनाही समजेल, असं त्या म्हणाल्या.

  यावेळी त्यांनी महिला नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. फक्त तिकीट घेऊन जमत नाही. निवडून आलं पाहिजे. इलेक्ट्रोल मेरीट लागतं. सक्षम असलेल्या महिलेला संधी दिली पाहिजे. पण केवळ महिला आहे म्हणून मला संधी द्या, या मताची मी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पार्टीने महिलांना सर्वाधीक संधी दिली आहे.

  यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली. कुणाच्या परवानगीने मला नोटीस दिली? मला अशा ५६ नोटिसा येत असतात. मला पाठवलेली नोटीस जशी जाहीर करण्यात आली, तसं मी पाठवलेलं उत्तरही जाहीर करा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

  यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत मोठ्या गॅपने बाहेर आले आहेत. तुरुंगात मानसिक शारिरीक परिणाम होत असतात. हे दूरगामी परिणाम असतात. त्यामुळे ते बोलत आहेत. त्यांना आरामाची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला. या पत्रकार परिषदेस माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह महीला पदाधिकारी उपस्थित होत्या .