नागपुरात हिंगणा एमआयडीत ॲग्रो कंपनीत लागली आग; चार कामगारांचा धुराने गुदमरून मृत्यू

आधीच आगीने रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे कारखान्यात काम करणारे कामगार तिथेच अडकले आणि धुरामुळे गुदमरून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर, तीन जण गंभीर जखमी झाले

    नागपूर: नागपूरमधुन एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील हिंगणा एमआयडीसीमधील ( Hingana  MIDC) एका कटारिया अॅग्रो कंपनीला (Agro Compony) भीषण आग लागली आहे. या अपघातात चार कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इलेक्ट्रिक केबलचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

    सकाळच्या सुमारास लागली आग

    हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या कटारिया ॲग्रो कंपनीत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीत जनावरांसाठी पेंढा बनवण्यात येतो. यासोबतच येथे बायोगॅस निर्मितीचही काम करण्यात येतं. कंपनीत सोमवारी सकाळच्या सुमारास काम सुरू होतं. यावेळी कंपनीत सुमारे 10 ते 15 लोकं काम करत होते. यावेळी सकाळी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. बघता बघत ही आग पेंढा ठेवलेल्या जागेपर्यंत पसरल्याने संपुर्ण कंपनीला आगेने कवेत घेतले. त्यामुळे संपूर्ण कारखाना धुराने भरला होता. त्याचवेळी आकाशात धुराचे मोठे मोठे लोट दिसालयला लागले.

    चार मजुरांचा जागीच मृत्यू

    काम सुरू असताना अचानक लागलेल्या आगीमुळे कारखान्यात एकच खळबळ उडाली. कामगारांना काही सुचायच्या आधीच आगीने रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे कारखान्यात काम करणारे कामगार तिथेच अडकले आणि धुरामुळे गुदमरून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर, तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आगीची महिती कळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान,  अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. मात्र,  धुराचे प्रमाण जास्त असल्याने आग विझवण्यास मोठी अडचण येत होती, मात्र अथक परिश्रमानंतर सुमारे दोन तासांत आग आटोक्यात आणण्यात आली.

    उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

    या दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता आग नियंत्रणात आहे. या घटनेत तीन कामगार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.