मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल, तपास सुरू

वैद्यकीय शिक्षणासाठी एनआरआय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिषाने एकाची २७ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (रा. चिखली) व राहुल तुपेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : वैद्यकीय शिक्षणासाठी एनआरआय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिषाने एकाची २७ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (रा. चिखली) व राहुल तुपेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र खंडेराव देशमुख (वय ५९, रा. वसंत कमल विहार सोसायटी, दत्त दिगंबर कॉलनी, आंबेडकर चौकाजवळ, वारजे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२२ ते रविवार (दि २६ नोव्हेंबर) या कालावधीत अनिल देवगिरींचे घरी आणि सिंहगड रोडवरील सिंहगड इन्स्टीट्युटच्या ऑफिसमध्ये घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महेंद्र देशमुख यांच्या मुलीला मेडिकलला अ‍ॅडमिशन घ्यायचे होते. आरोपी पवन सुर्यवंशीने त्यांच्याशी संपर्क साधला. मुलीचे मेडिकल अ‍ॅडमिशन करुन देतो असे सांगितले व जयेश शिंदे याच्याशी तक्रारदार यांची ओळख करुन दिली. जयेश याने एनआरआय कोट्यातुन मुलीचे अ‍ॅडमिशन करुन देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी २७ लाख २६ हजार रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात घेतले. मात्र, त्यांच्या मुलीचे अॅडमिशन केले नाही. त्यामुळे त्त्यांनी अ‍ॅडमिशन करण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. आरोपींनी पैसे परत न करता महेंद्र देशमुख यांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.