तुरुंगात डांबण्याची भीती दाखवून एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याला 50 हजारांचा गंडा

सायबर गुन्हेगाराने सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली. कारागृहात डांबण्याची भीती दाखवून 50 हजार रुपये उकळले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला.

    नागपूर : सायबर गुन्हेगाराने सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली. कारागृहात डांबण्याची भीती दाखवून 50 हजार रुपये उकळले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला. अंबाझरी परिसरात राहणारे 59 वर्षीय फिर्यादी हे केंद्र शासनाच्या कार्यालयात महाव्यवस्थापक आहेत.

    आरोपीने फोन करून त्यांच्या आधारकार्डचा वापर करून मुंबईमध्ये कोणीतरी सीमकार्ड खरेदी केले. त्या सीमकार्डचा वापर वाईट कामासाठी केला जात आहे. काही लोकांनी त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केली असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणात तुम्हाला अटक होऊन कारागृहात जाण्याची सुद्धा वेळ येऊ शकते, अशी भीती दाखविली. या प्रकरणातून वाचविण्यासाठी फिर्यादीला रोख रकमेची मागणी केली.

    घाबरलेल्या फिर्यादीने 50 हजार रुपये त्याच्या बँक खात्यात पाठविले. यानंतर पुन्हा त्याने एटीएमद्वारे रक्कम ट्रान्सफर करण्याची मागणी केली. एक सीबीआय अधिकारी अशा पद्धतीने पैशांची मागणी करत असल्याने फिर्यादीचा संशय बळावला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.