नोकरीला लावतो म्हणाला अन् आठ लाखांना गंडा घातला; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय खाद्य निगममध्ये नोकरीला लावतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात महेश सुभाष ताम्हणकर यांची आठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

    तळोजा : भारतीय खाद्य निगममध्ये नोकरीला लावतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात महेश सुभाष ताम्हणकर यांची आठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. वरळी बीडीडी चाळ-मुंबई येथील महेश सुभाष ताम्हणकर यांना एका मित्राने हरेश काशीद हे भारतीय खाद्य निगम येथे नोकरीला लावण्याचे काम करत असल्याचे सांगितले.

    हरीश काशीद, वैभव कुबल, मंगल जाधव, मोहित कुमार राणा, विशाल गुप्ता यांनी संगनमत करून भारतीय खाद्य निगम येथे नोकरीला लावतो असे सांगून आठ लाख घेतले. मात्र, त्यांना नोकरीला न लावता घेतलेले पैसे परत केले नाहीत आणि फसवणूक केली. ८ लाखांचा धनादेश दिला असता तोदेखील वटला नाही.

    तसेच, दिल्ली, पंजाब, नागपूर, विशाखापट्टणम येथे असलेले अमित कणसे, माधव कदम, केशव कदम, ओमकार काशीद, राकेश गावडे यांच्याकडे त्यांना नोकरी लावली किंवा याबाबत विचारणा केली असता त्यांनादेखील नोकरी मिळाली नसल्याचे सांगितले.

    याप्रकरणी हरीश प्रकाश काशीद (कामोठे), वैभव कुबल (घणसोली), मंगल संजय जाधव (उल्हासनगर), मोहित कुमार राणा, विशाल गुप्ता या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.