एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धांची फसवणूक ; १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दहिवडीत अट्टल चोरटा जेरबंद

वृद्ध नागरिकांना बँक, एटीएममध्ये एकटे गाठून त्यांच्या वृद्धपणाचा, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडील एटीएमची अदलाबदल करून खात्यातून पैसे काढणाऱ्या अट्टल चोरट्याला दहिवडी पोलिसांनी अटक केली. माण-खटाव तालुक्यातील बँका आणि एटीएमचे १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयिताला जेरबंद करण्यात यश आले.

    दहिवडी : वृद्ध नागरिकांना बँक, एटीएममध्ये एकटे गाठून त्यांच्या वृद्धपणाचा, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडील एटीएमची अदलाबदल करून खात्यातून पैसे काढणाऱ्या अट्टल चोरट्याला दहिवडी पोलिसांनी अटक केली. माण-खटाव तालुक्यातील बँका आणि एटीएमचे १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयिताला जेरबंद करण्यात यश आले.

    प्रमोद सिताराम यलमर (रा. कान्हरवाडी, ता. खटाव, जिल्हा सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तडवळे येथील कासिम जंगुभाई शेख (वय ६८) दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बँक ऑफ इंडिया दहिवडी येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना माझ्या एटीएममधून पैसे निघत नाहीत, तुमच्या तरी निघतात का ते पहा, असे म्हणत त्यांचे एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकले. त्यावेळी संशयित प्रमोद यलमर याने शेख यांच्या एटीएमचा पासवर्ड माहिती करुन घेतला. दरम्यान, संशयित यलमर याने हातचालाकीने एटीएम कार्ड बदलत शेख यांना दुसरेच एटीएम कार्ड दिले. या एटीएममधून पैसे निघत नाहीत. तुम्ही दुसऱ्या एटीएममधून पैसे काढा, असे सांगून तेथून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने शेख यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे कट झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. शेख यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या संशयित प्रमोद यलमरचा पोलिस दीड महिने शोध घेत होते.

    वेगवेगळ्या बँकांची कार्ड सापडली  
    सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पोलिस हवालदार खांडेकर, महिला पोलिस नाईक निलम रासकर, पोलीस कुदळे यांच्य पथकाने दहिवडी, म्हसवड, गोंदवले बडूज, मायणी या परिसरातील शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयित प्रमोद यलमर याल अटक केली. यलमर याने दहिवडी वडूज, म्हसवड, गोंदवले परिसरातून वृद्ध नागरिकांना हेरून एटीएम बदलून पैसे काढल्याची कबुली दिली. त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड सापडली आहेत. तपास पोलिस हवालदार बापू खांडेकर करत आहेत.