तारण प्रॉपर्टी अल्पदरात देतो म्हणाला अन् व्यापाऱ्याला सव्वा कोटींना गंडा घातला; फसवणूक झाल्याचे कळताच…

सातपूर औद्योगिक प्रॉपर्टी लिलावात अल्पदरात घेऊन देतो, अशी बतावणी करत एकाने व्यापाऱ्यास तब्बल सव्वा कोटी रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड वर्ष उलटूनही प्रॉपर्टी न मिळाल्याने व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतली.

    नाशिक : सातपूर औद्योगिक प्रॉपर्टी लिलावात अल्पदरात घेऊन देतो, अशी बतावणी करत एकाने व्यापाऱ्यास तब्बल सव्वा कोटी रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड वर्ष उलटूनही प्रॉपर्टी न मिळाल्याने व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित शशिकांत निकम (रा. इंदिरानगर) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत भाऊसाहेब ठाणसिंग गिरासे (रा. कैलासनगर, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. गिरासे व्यापारी असून, सन २०२२ मध्ये संशयिताने पंचवटीतील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या रामदास केकाण यांच्या घरी त्यांना बोलावून घेतले होते.

    यावेळी संशयिताने पंजाब नॅशनल बँककडे सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. १०९-३ यासी क्षेत्र १३८५ चौमी या भूखंडासह त्यावरील ७६५.५३ चौमी आरसीसी बांधकाम तारण आहे. या प्रॉपर्टीचा लिलाव होणार असून, ही मिळकत अल्पदरात मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

    बनावट कागदपत्रे दाखवून विश्वास संपादन

    गिरासे यांनी मिळकत खरेदीची तयारी दर्शविताच संशयिताने खरेदी विक्रीसाठी लागणारी बनावट कागदपत्र त्यांना दाखविली. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. याबदल्यात १७ जुलै २०२२ ते २१ मार्च २०२३ दरम्यान गिरासे यांनी १ कोटी २७ लाख ६५ हजाराची रक्कम निकम याच्या स्वाधिन केली. मात्र, दीड वर्ष उलटूनही मिळकत त्यांच्या पदरात पडली नाही. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलिसात धाव घेतली.