सरकारी विभागात नोकरी लावतो म्हणाला अन् 2.10 लाखांना गंडा घातला; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

एका ठकबाजाने वन विभाग व कोल इंडियात लिपीक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची 2.10 लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी रवींद्र मछिंद्र हुमणे (वय 59, रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका) च्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

    नागपूर : एका ठकबाजाने वन विभाग व कोल इंडियात लिपीक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची 2.10 लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी रवींद्र मछिंद्र हुमणे (वय 59, रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका) च्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

    सुधीर नारायण चापले (वय 50, रा. लोखंडी, समुद्रपूर, वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. रवींद्र यांचा मुलगा अमित याचे आयटीआय झाले असून तो नोकरीच्या शोधात होता. वडीलही मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्नशील होते. दरम्यान त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीकडून आरोपी सुधीर चापलेशी ओळख झाली. त्याने अमितला नोकरी लावून देण्याचे आमिष दिले.

    वन विभाग किंवा कोल इंडियामध्ये लिपीक पदावर नोकरीचा विश्वास दिला. फार्मसाठी दहा हजार आणि नोकरीसाठी दोन लाख रुपये लागतील असे फिर्यादीला सांगितले. फिर्यादीचा विश्वास बसला. त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यांतर्गत आरोपीला 2 लाख 10 हजार रुपये दिले आणि मलाच्या नोकरीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, दिवसामागून दिवस निघत गेले. परंतु, नोकरी मिळण्याचे काही संकेत दिसत नव्हते.

    नोकरीबाबत वारंवार विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करायचा. नोकरी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी पैसे परत मागितले असता आरोपीने पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.