Facebook वापरताय? तर काळजी घ्या ! एक Friend Request आली अन् शिक्षकाला बसला तब्बल 96 हजारांचा फटका

बागलाण तालुक्यातील सटाणा येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या शिक्षकाला फेसबुकची रिक्वेस्ट स्वीकारणे चांगलेच अंगाशी आले. यामुळे शिक्षकाला ९६,५०० रुपयांचा नाहक भुर्दंड बसला.

    सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या शिक्षकाला फेसबुकची रिक्वेस्ट स्वीकारणे चांगलेच अंगाशी आले. यामुळे शिक्षकाला ९६,५०० रुपयांचा नाहक भुर्दंड बसला. याप्रकरणी राजेंद्र परशराम पवार (रा. शिवाजीनगर, भाक्षीरोड, सटाणा) यांनी ९२१६६३६३०२ व ७८७७९२१३३५ हे मोबाईल क्रमांक वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सटाणा पोलिसांत तक्रार दिली.

    सोशल मीडियाचा वापर शिक्षकाच्या चांगलाच अंगलट आला. शनिवारी (ता. ३०) रोजी सकाळी पवार यांना अज्ञात संशयितांनी फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे फोन केला. नंतर काहीतरी कारणं सांगून पवार यांच्या बँकेच्या अकाऊंटमधून सकाळी ११.५७ व दुपारी १२.५५ ला असे दोन वेळा प्रत्येकी ३२,५०० तर १.३५ वा. ३१,५०० रुपये, असे तीन वेळा फोन पेद्वारे पैसे काढून फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

    ओटीपी कोणालाही देऊ नका

    अनोळखी नंबरवरून फोन आल्यास मी बँकेतून बोलत आहे, असे सांगून आपल्या बँक खातेविषयी अथवा एटीएमचा पीन किंवा ओटीपी मागितल्यास देऊ नका. ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या, सतर्क राहा. आमिषाला बळी पडू नका.

    – बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, सटाणा.