पार्सल आलं नाही म्हणून गुगलवरून नंबर शोधला नंतर फटका बसला; ‘ती’ लिंक उघडली अन्…

मळनेर शहरातील सराफ बाजार परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेला बुकिंग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून 99 हजार 490 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

    अमळनेर : ऑनलाईन खरेदी करणे महिलेला चांगलेच महागात पडल्याची घटना घडली असून, तिची 99 हजारांची फसवणूक झाली आहे. अमळनेर शहरातील सराफ बाजार परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेला बुकिंग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून 99 हजार 490 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    योगिता राकेश भामरे (वय ३५, रा. सराफ बाजार, अमळनेर) यांनी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी मोबाईलच्या फेसबुक अकाऊंटवरून ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या एका अकाऊंटवरून लेडीज कुर्ता घेण्याची ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर २ डिसेंबरपर्यंत घरी येणार होती. दरम्यान, दिलेल्या ऑर्डरचे पार्सल घरी आले नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवर कुरिअर ट्रेकिंग लिस्ट शोध घेत मोबाईल क्रमांक मिळवला. त्यावर कॉल करून विचारणा केली असता समोरील अज्ञात व्यक्तीने काही तांत्रिक कारणामुळे पार्सल अडकल्याचे सांगून दिलेल्या एका फाईलवर क्लिक करण्याचे सांगितले.

    दरम्यान, महिलेने फाईलवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पहिल्यावेळी ९५ हजार रूपये आणि दुसऱ्या वेळेस ४ हजार ४९० रुपये असे एकूण ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.