फॉरेक्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सव्वा तीन काेटींचा गंडा; 7 जणांवर गुन्हा दाखल

फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २० जणांची तब्बल सव्वा तीन कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    पुणे : फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २० जणांची तब्बल सव्वा तीन कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, फसवणूक, अपहार, संगनमत करणे त्याचबरोबरच महाराष्ट्रातील ठेवीदार हितसंरक्षण कायद्याच्या (एमपीआयडी) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हनुमंत तुकाराम मोरे (रा. गांधीनगर, सातारा), नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते (रा. कोळकी, सातारा), अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण (रा. मुनानगर, सातारा), शशिकला मारूती वादगावे आणि सुरेश गोरख कुंभार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दिगंबर पोपट गायकवाड (३८, रा.) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जुलै २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान कात्रज येथील दोन हॉटेलमध्ये व डेक्कन येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांना आरोपी नामदेव गायकवाड आणि रस्ते यांनी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास २० टक्के रक्कम परतावा मिळेल असे आमिष दाखविले. गायकवाड यांचा विश्वास संपादन करून त्यांना फॉरेक्स ट्रेडिंगबाबत माहिती दिली. तसेच इतर आरेापींसोबत ओळख करून दिली. आरोपी हे क्रिएशन ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स एलएलपी या कंपनीचे मालक असल्याचे सांगितले. तर गायकवाड यांनी नामदेव गायकवाड याच्याकडे दहा लाख रूपये रोख व क्रिएशन डेव्हलपर्सच्या नावे १० लाख व नंतर २ लाख ८५ हजार जमा केले. सुरूवातील त्यांना परतावा दिला. त्यानंतर इतरांनी मिळून ३ कोटी २५ लाख ८ हजार रूपये आरोपींना दिले. मात्र त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने व फसवणूक झाल्याने त्यांनी याबाबत तक्रार दिली आहे.