नोकरीच्या अमिषाने लाखोंची फसवणूक; बाप-लेकाने पाच लाखांना गंडवले

वीज कंपनी किंवा पोस्ट खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अहमदनगर येथील बापलेकाने पाच लाख रूपयांना गंडवले. विजय बाबुराव काकडे व सॅम्युएल विजय काकडे अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत.

    नाशिक : वीज कंपनी किंवा पोस्ट खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अहमदनगर येथील बापलेकाने पाच लाख रूपयांना गंडवले. विजय बाबुराव काकडे व सॅम्युएल विजय काकडे अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत.

    याबाबत ललिता मथियस एक्का यांनी फिर्याद दिली आहे. एक्का यांचा मुलगा रोहित याचा २०१९ मध्ये विवाह ठरला होता. यावेळी वधू पक्षाकडील मंडळी घर पाहण्यासाठी आले होते. त्यात दोघा संशयित बापलेकाचाही समावेश होता. ५ डिसेंबर रोजी झालेल्या या सोहळ्यात काकडे याने आपल्या सरकारी अधिकाऱ्यांशी मोठ्या ओळखी असल्याची बतावणी करत मुलगा रोहित यास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. वधू पक्षाकडून आलेल्या नातेवाईकांकडून नोकरी लावून देण्याची हमी मिळाल्याने कुटूंबियांनीही आपल्या मुलासाठी पैसे भरण्याची तयारी दर्शविली.

    यावेळी तीन लाख रूपयांची रोकड काकडे यांनी बापलेकाच्या स्वाधीन केली. त्यानंतर एक्का यांच्या पतीच्या बँक खात्यातून दोन लाख रूपये ऑनलाईन संशयितांनी स्वीकारले. मात्र, चार वर्षे उलटूनही नोकरी लागली नसल्याने एक्का कुटुंबियांनी पैशांची मागणी केली असता संशयितांनी टाळाटाळ केली. अखेर पोलिसांत तक्रार देण्यात आली.