स्वस्तात विमान तिकिटे मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

स्वस्तात विमान प्रवासाची तिकिटे मिळवून देण्याच्या आमिषाने एका पर्यटन कंपनीच्या मालकाने तीन लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पर्यटन कंपनीच्या मालकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

    पुणे : स्वस्तात विमान प्रवासाची तिकिटे मिळवून देण्याच्या आमिषाने एका पर्यटन कंपनीच्या मालकाने तीन लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पर्यटन कंपनीच्या मालकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी आर्या हाॅलिडेज कंपनीचा मालक अनिकेत दामले (रा. विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहित आबासाहेब कोतवाल (वय ३०, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    कोतवाल यांची पार्थ टुर्स अँड ट्रॅव्हल्स पर्यटन कंपनी आहे. कोतवाल यांच्या कंपनीकडून केदारनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दामले यांनी कोतवाल यांना पुणे ते दिल्ली विमान प्रवासाची तिकिटे कमी किंमतीत काढून देतो, असे सांगून कोतवाल यांच्याकडून सुरुवातीला एक लाख ६१ हजार ८०० रुपये घेतले. त्यानंतर विमान तिकिटाची किंमत वाढली असल्याचे सांगून त्यांच्याकडून पुन्हा दोन लाख २८ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर कोतवाल यांना दामले यांनी विमान तिकिटे दिली नाही.

    कोतवाल यांनी याबाबत विचारणा केली. कोतवाल यांनी पैसे परत मागितले. दामले यांनी त्यांना पैसेही परत दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कोतवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करत आहेत.