‘सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ अपलोड केलाय, डिलिट करायचाय तर पैसे द्या’, असे म्हणत व्यापाऱ्याला 43 लाखांचा गंडा

छत्रपती शिवाजीनगरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्यास अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असून, तो डिलिट करण्यासाठी पैसे द्या, अशी धमकी देत दोघांनी ४३ लाख ३ हजार ४९० रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

    जळगाव : येथील छत्रपती शिवाजीनगरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्यास अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असून, तो डिलिट करण्यासाठी पैसे द्या, अशी धमकी देत दोघांनी ४३ लाख ३ हजार ४९० रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    केशव महादेव पोळ (वय ६५, रा. छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) यांना २५ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान पूजा शर्मा, संजय माथुर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज केले. तसेच व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाले असून, ते डिलिट करायचे असतील तर पैसे द्या अन्यथा तुमच्या घरी पोलिस पाठवून तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली.

    यात व्यापारी पोळ हे घाबरल्याने त्यांच्याकडून वेळोवेळी तब्चल ४३ लाख तीन हजार ४९० रुपये खंडणीच्या स्वरुपात आले. वेगवेगळ्या बँक खात्यावर स्वीकारले. एवढी रक्कम देऊनही वारंवार धमकी दिली जात असल्याने केशव पोळ यांनी अखेर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.