मोफत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया अपहार ; उंब्रजच्या डॉक्टरला अभय तर फलटणचे डॉक्टर दोषी

कारवाईबाबत संभ्रम; पालकमंत्र्यांनी घातले लक्ष

  पराग शेणोलकर, कराड: कोरोना महामारीच्या काळात आदर्श काम करणाऱ्या उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रांची सध्याची घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दोन महिला डॉक्टरांच्या सततच्या कुरबुरीमुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होऊ लागले आहे. आरोग्य सेविका तसेच कर्मचाऱ्यांमध्ये उघडउघड दोन गट पडले आहेत. तर डेंगू सदृश साथ असताना ट्रीपवर असणाऱ्या डॉक्टरांमुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. याबाबत काही जागरूक नागरिकांनी गत सहा महिन्यातील लेखाजोखाच मांडला पालकमंत्री यांच्यासमोर मांडला. याची गंभीर दखल कराड उत्तरचे आमदार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  दरम्यान, सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. मात्र, पैसे घेणाऱ्या व्यक्ती कोण याचा उलगडा केला नाही. उंब्रज आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी ‘त्या’ दिवशी नेमके काय करीत होत्या? आम्ही आरोग्य सेविकेला पैसे दिले मग कारवाई फलटणच्या डॉक्टर वर का? उंब्रजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणाच्या दबावात सूट दिली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे उंब्रजच्या डॉक्टरांना अभय आणि फलटणचे डॉक्टर दोषी धरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

  कारवाईचा फार्स…?

  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांनी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोग्य केंद्रात भेट दिली. या दरम्यान आरोग्य सेविकेने या प्रकरणात पैसे घेतल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले. मात्र नावे स्पष्ट करण्यास नकार दिला. त्यामुळे या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाईचा फार्स करत पीडित नागरिकांची बोळवण केली असल्याची दिसून आले आहे.

  दोन्ही महिला डॉक्टर

  उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला आणि एक पुरुष वैद्यकीय अधिकारी असावा अशी मागणी नागरिकांची आहे. दोनही महिला डॉक्टर असल्याने गोरगरीब पुरुष रुग्णांना काही न सांगता येणारे आजार कथन करताना संकोच व्यक्त होत आहे. यामुळे नाईलाजाने खासगी दवाखान्यात उपचार करून घ्यावे लागत आहेत.

  राजकीय वरदहस्त

  उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी वाढल्याची चर्चा आहे. रुग्णांशी वागणूक नीट नसणे, कोविड लसीकरण, सरकारी कर्मचाऱ्यांना मेडिकल सर्टिफिकेट देताना चुकीची वागणूक देणे अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या असून रुग्णांची हेळसांड सुरू आहे.

  पालकमंत्र्याचे कारवाईचे आदेश

  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मतदारसंघातील आदर्श सरकारी दवाखाना म्हणून काही काळापूर्वी उल्लेख होत असलेल्या उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी प्रकारची तक्रार ना. पाटील यांच्याकडे झाली आहे. याप्रकरणी डॉ. राधाकृष्ण पवार यांना दोषी डॉक्टरवर तातडीने कारवाई करुन इतरत्र बदली करण्याचे आदेश दिले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.