मोफत धान्याला मोजावे लागतात पैसे, ‘या’ तालुक्यातील खळबळजनक प्रकार; संतप्त नागरिकांनी रेशन दुकान पाडले बंद

राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मौजे घुगलवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानात सर्वांना धान्य पैसे देऊन विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही अधिकारी याची दखल घेत नसल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत स्वस्त धान्य दुकानदारास दुकान बंद ठेवण्यास भाग पाडले.

  श्रीगोंदा : देशासह राज्यात (Starte) गोरगरीब सर्वसामान्य जनतेला रेशनकार्डवर गहु, तांदूळ हे केंद्र सरकारने (Goverment) १ जानेवारी २०२३ पासून मोफत धान्य वाटपाचे धोरण ठरवले आहे. यानुसार सर्वत्र सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला गहु, तांदूळ, मोफत मिळत आहे. परंतु, राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मौजे घुगलवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानात सर्वांना धान्य पैसे देऊन विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही अधिकारी याची दखल घेत नसल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत स्वस्त धान्य दुकानदारास दुकान बंद ठेवण्यास भाग पाडले.

  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे घुगलवडगाव येथील तात्यासाहेब बापुराव झराड हे स्वस्त धान्य दुकान चालवितात. त्यांच्याकडे बेलवंडी कोठार येथीलही दुकान असून त्यांनी गुरुवारी ( दि. २) सकाळी दुकान उघडले. धान्य नेण्यासाठी नागरिक आले असता रेशन कार्डावरील गहु, तांदूळ हे मोफत असताना दुकानदाराने पैसे घेऊन वाटपास सुरवात केली. याबाबत गावातीलच काही जेष्ठ नागरिक व महिला यांनी ‘मोदी सरकारचे धान्य फुकट आहे. तुम्ही पैसे का घेता’, अशी विचारणा केली . त्यावर ज्यांनी पैसे दिले त्यांनाच धान्य दिले व ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांना धान्य देण्यास त्यांनी नकार दिला.

  फोन करूनही पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

  याबाबतची चर्चा गावभर पसरल्याने दुकानासमोर गावातीलच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने एकच गोंधळ उडाला. काही जणांनी तात्काळ श्रीगोंदा तहसील कार्यालय व पुरवठा विभागाशी संपर्क साधला. परंतु, तक्रारदारांनी वेळोवेळी फोन करूनही दुपारपर्यंत महसूल व पुरवठा विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी फिरकला नाही. त्यानंतर संतप्त नागरिक व महिलांनी स्वस्त धान्य दुकानदारास आम्हाला मोदी सरकारचे मोफत असलेले धान्य तुम्ही विकत का दिले, असा जाब विचारत दुकानदाराला घेराव घातला. ‘आम्हाला मोफत धान्य कधीच दिले नाही. मोफत धान्य कधी मिळणार याची कार्डधारक विचारणा करीत होते.

  काही कार्डधारकांचे पैसे केले परत

  दरम्यान, सदर दुकानदाराने काही जणांना घेतलेले धान्याचे घेतलेले पैसे परत दिले. तर ज्यांचे धान्याचे घेतलेले पैसे राहिले आहेत त्यांचे परत देईन, असे दुकानदाराने सांगितले. यावर ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने त्यांनी सध्या दुकान बंद ठेवा. जेव्हा महसुल पुरवठा विभागाचे अधिकारी गावात येतील आणि गहु, तांदूळ हे धान्य मोफत आहे की विकत हे ठरल्यानंतरच दुकान सुरू करा, असे संतप्त नागरिकांनी सांगितले व त्यानंतर सदर स्वस्त धान्य दुकानदाराने दुकान बंद केले.

  महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात अनागोंदी ?

  देशासह राज्यात गोरगरिबांना धान्य मोफत मात्र श्रीगोंद्यात विकत घ्यावे लागत आहे. राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेत याबाबत एकच उलट सुलट चर्चा सुरू आहे.

  केंद्र सरकारचे रेशनवरील धान्य हे मोफत आहे. हे प्रसार मध्यमांद्वारे सर्वांना माहित असताना देखील लोकांनी पैसे दिलेच कसे ?. व स्वस्त धान्य दुकानदारानेही कार्डधारकांकडून पैसे घेतलेच कसे ?.

  - सुधाकर भोसले, प्रांतअधिकारी, श्रीगोंदा -पारनेर.