स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांचं निधन; वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सांगली येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव भुजंगराव माने (आप्पा) यांचे आज (दि.21) निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सकाळी 9 वाजता त्यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव भुजंगराव माने (आप्पा) यांचे आज (दि.21) निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सकाळी 9 वाजता त्यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

    विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ अंत्यदर्शनासाठी सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. सांगलीच्या अमरधाममध्ये सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांनी १० जुलैला वयाच्या शंभरीत पदार्पण केले होते, येळावी (ता. तासगाव) येथे १० जुलै, १९२४ रोजी माधवराव भुजंगराव माने यांचा जन्म झाला. तासगाव हायस्कूल येथे शिक्षण घेत असतानाच ते क्रांतिसिंह नाना पाटील यांना गुरू मानून शालेय शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात उतरले.

    गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९४२चा ब्रिटिशविरोधी ‘चले जाव’चा लढा सुरू झाला आणि ३ ऑगस्ट, १९४२ रोजी तासगावच्या मामलेदार कचेरीवर १० हजारांचा मोर्चा काढून ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा ध्वज फडकावण्यात ते यशस्वी झाले. नऊ क्रांतिकारकांना ठार मारणाऱ्या फौजदाराच्या घरावर बॉम्ब टाकण्यात सहभाग घेतला. याच कारणास्तव नऊ महिने कारावास भोगला होता, अशा स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटनांचे साक्षीदार असणारे माधवराव माने यांचे आज निधन झाल्याने सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्यातील अखेरचा तारा निखळला आहे.