अलमट्टीच्या उंचीवरून पाेटात गाेळा! ; शिरोळ तालुक्याला पूरसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागणार

सध्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारकडून विचार सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उंची वाढविण्याचा आमचा निर्णय झाला आहे, असे तेथील सरकारने जाहीर केलेले नाही, किंवा महाराष्ट्र शासनाला तसे अवगत केलेले नाही, असे असले तरी कर्नाटक सरकारवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही.

  दीपक घाटगे, कोल्हापूर : सध्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारकडून विचार सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उंची वाढविण्याचा आमचा निर्णय झाला आहे, असे तेथील सरकारने जाहीर केलेले नाही, किंवा महाराष्ट्र शासनाला तसे अवगत केलेले नाही, असे असले तरी कर्नाटक सरकारवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही. कारण २००५ मध्ये पहिला महापूर आला तो अलमट्टी धरणामुळे आलेला नाही, असा खुलासा तेव्हा कर्नाटक सरकारने केला होता. पण शिरोळ तालुक्याला पूरसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे. कारण त्यापूर्वी अलमट्टी धरणात पाणी संचय केला जात नव्हता. २००५ मध्ये धरणात पाणी संचय सुरू झाला आणि मग कोल्हापूर, सांगली, जिल्ह्यात कृष्णाच्या पाण्याचे संकट अलमट्टीमुळे येऊ लागले, ही वस्तुस्थिती आहे.

  कोल्हापूरची पंचगंगा नदी श्री क्षेत्र नरसिहवाडी येथे कृष्णा नदीला मिळते. ही कृष्णा नदी शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचा राजापूरवाडी बंधारा येथून कर्नाटक हद्दीत जाते. अलमट्टी धरण प्रकल्प व्हायच्या आधी राजापूरवाडी बंधाऱ्यातून पुढे सोडले तरच कर्नाटकाला पाणी मिळते. त्यामुळे दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात राजापूर वाडी बंधारा हा तणावग्रस्त ठिकाण बनतो. सुमारे २२ वर्षांपूर्वी कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी राजापूरवाडी बंधारा फोडून कर्नाटकात पाणी पळवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा बंदोबस्तावरील कोल्हापूर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पाण्याचा प्रश्न तेव्हा चांगलाच पेटला होता. आमच्या शेतीने पाणी पिल्याशिवाय तुमच्या शेतीला पिण्यासाठी पाणी सोडणार नाही, असा निर्धारच शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेव्हा केला होता. आता परिस्थिती बदलली आहे.

  विजापूर जिल्ह्यात अलमट्टी येथे कोयना धरणापेक्षा मोठे धरण कर्नाटक सरकारने बांधले आणि ते पूर्ण झाले आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक गावे अलमट्टी धरणाच्या बँक वॉटरमध्ये बाधित होऊ लागली. केवळ अलमट्टी धरणातील बॅक वॉटरमुळेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वर पाण्याचे संकट येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्नाटक सरकार विरुद्ध संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आली आणि पावसाळ्यामध्ये पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करण्यात आले. पण तरीही या दोन जिल्ह्यातील पाण्याचे संकट काही कमी झालेले दिसत नाही. इसवी सन २०१९ व २०२१ या दोन वर्षात कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अनेक गावे केवळ अलमट्टी धरणातील बॅक वॉटरमुळे जलमय झाली होती. सर्वाधिक नुकसान या दोन जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे झाले होते.

  उंची वाढवण्याच्या हालचाली
  अलमट्टी धरणाची उंची यापूर्वी एकदा वाढवण्यात आली होती. त्यावेळीही महाराष्ट्राने त्याला विरोध केला होता. पण प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे आणि नंतर न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे महाराष्ट्राला हतबल व्हावे लागले होते. आता या अलमट्टी धरणाची पुन्हा एकदा उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा विचार सुरू असल्याचे समजते. तेथील सरकारने तसे अधिकृतरित्या महाराष्ट्र सरकारला अवगत केले नसले तरी धरणाची उंची वाढवण्याच्या सुप्त हालचाली सुरू असल्याशिवाय महाराष्ट्रात अशी चर्चा होणार नाही, हे पण तितकेच खरे आहे.

  तर सीमा भागात संघर्षाची ठिणगी
  अलमट्टी धरणाची पुन्हा उंची वाढवली तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ६०० गावांना त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जलसंपदा विभागाचा कार्यभार असल्यामुळे त्यांनी कर्नाटक सरकारशी संवाद साधला पाहिजे, कारण कर्नाटकामध्ये भाजपचे सरकार आहे. अलमट्टी धरणाची उंची पुन्हा वाढवली तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती अतिशय गंभीर बनू शकते, याची माहिती त्यांनी कर्नाटक सरकारला दिली पाहिजे. कर्नाटक सरकारने तसे काही केले नाही, तिथल्या लोकांना अवगत केले नाही तर मात्र कर्नाटक सरकार विरोधात सीमा भागात संघर्षाची ठिणगी पडू शकते.

  विसर्गाच्या नियाेजनाने टळले संकट
  सध्या परतीचा पाऊस सुरू आहे यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षी सारखी महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाही. कारण महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या विसर्गाचे नियोजन केलेले होते. त्यामुळे पंचगंगा नदीला महापुराच्या पाण्याची फुग आलेली नव्हती तशीच स्थिती सांगली जिल्ह्यातही होती त्यामुळेच जल संकट टळले पण अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर पाण्याच्या विसर्गाचे कितीही नियोजन केले तरी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुराचे संकट टाळणार नाही.