लूटमार करणाऱ्या टोळीतील फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; राहुरी येथून घेतले ताब्यात

ओतूर- मढ (ता. जुन्नर) येथे मध्यरात्री गाडी आडवी लावून व्यापाऱ्याचे पैसे लुटणाऱ्या टोळीतील आठ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय २२ रा. येवले आखाडा, ता.राहुरी जि.अ नगर), असे अटक आरोपीचे नाव आहे.

    नारायणगाव : ओतूर- मढ (ता. जुन्नर) येथे मध्यरात्री गाडी आडवी लावून व्यापाऱ्याचे पैसे लुटणाऱ्या टोळीतील आठ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय २२ रा. येवले आखाडा, ता.राहुरी जि.अ नगर), असे अटक आरोपीचे नाव आहे.

    याबाबत नारायणगाव येथील व्यापारी व या घटनेचे फिर्यादी सुरेश राजेंद्र कोठारी (वय ४४) यांनी फिर्याद दिली होती. १२ मे २०२२ रोजी कोठारी व त्यांच्याकडे कामाला असलेला दीपक बंडगर हा पिकअप गाडीमध्ये तेल विक्रीसाठी घेऊन मुरबाड येथे गेले होते. त्या ठिकाणी तेलाची डिलिव्हरी देऊन रोख रक्कम घेऊन परत नारायणगावच्या दिशेने येत असताना ओतूर हद्दीत मढ गाव येथे कोठारी यांच्या पिकअप समोर एक चारचाकी गाडी आडवी लावून त्यातून ४-५ जण खाली उतरले व ड्रायवरला दमदाटी करून पैसे असलेली पिशवी घेऊन गेले होते.

    राहुरी येथे सापळा लावून केली अटक

    याबाबत गुन्हा दाखल होताच तीन आरोपींना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखाने राहुरी येथून अटक केली होती. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील फरार आरोपी भैया उर्फ सागर हा त्याच्या गावात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी फॅक्टरी नाका, राहुर येथे सापळा लावून सागर खांदे या आरोपीस ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासकामी ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, हवावदार दिपक साबळे, राजू मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले यांनी केली आहे.