मोक्क्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथक एकची मोठी कारवाई

मोक्काच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने सापळा रचून जेरबंद केले. तो पोलिसांना गुंगारा देण्यात दोन वर्षांपासून यशस्वी होत होता.

    पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने सापळा रचून जेरबंद केले. तो पोलिसांना गुंगारा देण्यात दोन वर्षांपासून यशस्वी होत होता.

    सिद्राम उर्फ अभी रमेश मंजिली (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, अमोल आवाड, राजेन्द्र लांडगे, अमर पवार यांनी केली आहे.

    वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलीस आयुक्तांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. दरम्यान, सिद्राम हा गुन्हा नोंद होताच फरार झाला होता. त्यावेळपासून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.

    दरम्यान, सिद्राम हा सोलापूरमधील रविवार पेठ येथे असल्याची माहिती पोलीस नाईक राजेंद्र लांडगे व पोलीस हवालदार अमोल आवाड यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून जेरबंद केले. पुढील तपासासाठी त्याला वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.