मोक्का गुन्ह्यातील फरार टोळी प्रमुखाला बेड्या; सहकारनगर पोलिसांची कारवाई

बालाजीनगर परिसरात कोयत्याने मारहाण करुन दहशत पसरवणाऱ्या तसेच मोक्का कारवाईनंतर फरार झालेल्या टोळी प्रमुखाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

    पुणे : बालाजीनगर परिसरात कोयत्याने मारहाण करुन दहशत पसरवणाऱ्या तसेच मोक्का कारवाईनंतर फरार झालेल्या टोळी प्रमुखाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर त्याला पकडण्यात यश आले. सनी शंकर जाधव (वय २६ रा. बिबवेवाडी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

    ही कामगीरी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल खंडाळे, बापु खुटवड, पोलीस अंमलदार व यांच्या पथकाने केली.

    दोन महिन्यांपुर्वी (दि. २५ ऑक्टोंबर) सनी जाधव व त्याच्या साथीदारांनी भांडण मिटवण्यसाठी बोलावले असता मारहाण करुन एकावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. तर आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच दाखल गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

    दरम्यान गुन्हा दाखल होताच सनी जाधव हा फरार झाला होता. त्याचा शोध घेतला जात होता. तेव्हा सनी हा कात्रज येथे राजस सोसायटी चौकात मित्राला भेटण्यासाठी आला असून मित्राची वाट पाहात थांबला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने सापळा रचुन त्याला पकडले.

    सनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन, जबरी दुखापत १, दरोडा १, मारामारी अशा प्रकारचे १२ गुन्हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच दोन वर्षा करीता पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातून दोन वर्षा करीता तडीपार केले होते.